लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले. शाळांकडून फीसाठी करण्यात येणाऱ्या सक्तीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेने संपूर्ण फी भरल्याशिवाय दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास नकार दिला होता. याविरोधात पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले. अखेर वाशी पोलिसांच्या मध्यस्थीने मार्ग काढण्यात आला असून, ट्युशन फी भरल्यावर विद्यार्थ्यांचे बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास शाळा तयार झाली आहे.
लॉकडाऊन काळात शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवावे तसेच पालकांना फीसाठी सक्ती करू नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु अनेक शाळा या नियमांकडे दुर्लक्ष करीत असून फीसाठी सक्ती करीत असल्याच्या घटना नवी मुंबई शहरात घडत आहेत. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षाची फी भरल्यावरच बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरता येतील, असा फतवा काढला होता. याविरोधात माजी प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी शुक्रवार, ८ जानेवारी रोजी शाळेबाहेर आंदोलन केले. पालकांच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाची भेट घेतली. या वेळी शाळेबाहेर पोलिसांचादेखील बंदोबस्त होता. या वेळी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मध्यस्तीने ट्युशन फी भरून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरता येतील ही मागणी शाळा प्रशासनाने मान्य केली.
निकालासाठी न रोखण्याचा दिला सल्लाऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने पालकांकडून फक्त ट्युशन फी घेण्यात यावी, फी भरली नसल्यास कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नये, विद्यार्थ्यांना परीक्षा अथवा निकालासाठी रोखू नये आदी मागण्या या वेळी पालकांकडून शाळा प्रशासनाला करण्यात आल्या.