उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:04 PM2023-08-14T21:04:08+5:302023-08-14T21:04:19+5:30

पालक-शिक्षक संघटनेच्या ५०० कार्यकर्त्यांची शाळेवर धडक

Parents protest against UES school in Uran | उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार

उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : उरणातील नामांकित युईएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्यवस्थापनाने चालविलेल्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (१४) संतप्त झालेल्या पालक-शिक्षक संघटनेने जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त केला. उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची १२ पर्यंत शाळा आहे.या शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात मागील अनेक वर्षांपासून पालक-शिक्षक संघटनेचा संघर्ष सुरू आहे.

नुकतेच पालक-शिक्षक संघटनेला अंधारात ठेवून विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राच्या नावाखाली ५५० रुपये वसूल करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या वादग्रस्त निर्णयावर संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वादळी चर्चा झाली. चर्चेत ओळखपत्रासाठी करण्यात येत असलेल्या भरमसाठ फी आकारणी विरोधात संतप्त झालेल्या संघटना आणि पालकांनी धारेवर धरत व्यवस्थापनाची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे व्यवस्थापनाने बैठकीतुनच काढता पाय घेतला.

व्यवस्थापनाचा पळपुटेपणा पालक संघटनेला भावला नसल्याने सोमवारी (१४) शाळेच्या आवारातच उत्स्फूर्तपणे जमलेल्या पालक-शिक्षक संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पालकांनी व्यवस्थापना विरोधात जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त केला. इतक्यावरच न थांबता पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी युईएस व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचून उरण गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. गटशिक्षण अधिकारी  प्रियांका पाटील यांनीही तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांच्याशीही शाळेच्या मनमानी कारभाराबाबत चर्चा केली असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांनी दिली.

युईएस शाळा व्यवस्थापनाचा मनमानी कारभाराचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.सातत्याने केली जाणारी भरमसाठ फी वाढ विद्यार्थी- पालक वर्गासाठी चिंतेची बाब ठरते आहेच.त्याशिवाय वाढविण्यात आलेली फी पालकांकडून सक्तीने वसूल केली जात आहे.त्यातच आता कहर की काय वसुल करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या फी मधुन ओळखपत्रासाठी आवश्यक फी याआधीच वसुल करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही ओळखपत्राच्या नावाखाली ५५० रुपये वसूल करण्यात येत आहेत.

शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे मात्र विद्यार्थी,पालकांचे नाहक आर्थिक शोषण केले जात आहे.मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे कारण ठरू लागले आहे.त्याचा नकळतपणे विपरीत परिणाम पालक, विद्यार्थ्यांवर होत आहे.शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात याआधी पासुनच संघर्ष सुरू आहे. यापुढेही संघर्ष कायम सुरू राहणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक-शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा ॲड.प्रतिभा भालेराव यांनी व्यक्त केली आहे.

मुले शाळेत येताना आणि शाळा सुटल्यावर बाहेर जाताना पालकांना माहिती देणारी  तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.या अत्याधुनिक यंत्रणेपोटीच फी आकारणी केली जात आहे.६५ टक्के पालकांनी तर फी अदाही केली आहे.मात्र शाळेची नाहक बदनामी करण्याच्या कटकारस्थानामागे काही राजकीय संघटना कार्यरत आहेत.शाळा व्यवस्थापनाचे कामकाज नियमानुसार सुरू आहे.अशी प्रतिक्रिया युईएस संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन यांनी दिली.

Web Title: Parents protest against UES school in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.