न्यू होरीजन शाळेविरोधात पालकांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:31 AM2020-08-18T00:31:13+5:302020-08-18T00:31:22+5:30
न्यू होरीजन पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाने मार्च ते आॅगस्टच्या आॅनलाइन अभ्यासक्रमाच्या फीसाठी एसएमएस, मोबाइलद्वारे ‘फी’ भरण्याचा तगादा पालकांकडे लावला आहे.
नवी मुंबई : कोरोना संसर्ग सुरू असताना, शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल, याची खात्री नसताना काही शाळा व्यवस्थापनाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी ‘फी’चा तगादा लावला आहे. या निषेधार्थ ऐरोली येथील न्यू होरीजन शाळा व्यवस्थापनाविरोधात पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.
ऐरोली सेक्टर १९ येथील न्यू होरीजन पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाने मार्च ते आॅगस्टच्या आॅनलाइन अभ्यासक्रमाच्या फीसाठी एसएमएस, मोबाइलद्वारे ‘फी’ भरण्याचा तगादा पालकांकडे लावला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या या जाचाला कंटाळून सोमवारी, १७ आॅगस्ट रोजी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करीत निषेध केला. पालकांबरोबरच काही विद्यार्थीही या आंदोलनात सामील झाले होते. लॉकडाऊन काळात कंपनीकडून पूर्णपणे पगार मिळत नाही त्यात अनेकांचे गृहकर्जे, किराणा, घरभाडे, वीजबिल असा खर्च असल्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडे फी भरण्याबाबत काही महिने सवलत द्यावी, तसेच लॉकडाऊन काळातील फीमध्ये ७५ टक्के सवलत मिळावी, शाळा सुरू झाल्यानंतर १०० टक्के फी भरण्याची तयारी असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
एकीकडे कोरोना संसर्ग तर दुसरीकडे पालकांकडे शाळा सुरू होण्याआधीच शुल्काची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशा शाळांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असतानाही, शाळा प्रशासन आडमुठे आणि मनमानी करून अक्षरश: आर्थिक लूट करीत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
>एप्रिलपासून शाळा व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, प्राचार्यांची भेट किंवा चर्चा होत नाही. जोपर्यंत शाळा सुरू होत नाही, तोपर्यंत कोणीही शाळेची फी भरणार नाही. जेवढी ट्युशन फी आकारण्यात आलेली आहे. त्यातील २५ टक्के रक्कम भरणार नाही. उर्वरित ७५ टक्के फी माफ करावी.
- अनुषा शिंपी, पालक, ऐरोली
>आमच्या शाळेने मार्चपासून आॅनलाइन क्लासेस सुरू केले आहेत. समर व्हेकेशन पूर्णपणे शिकविले आहे. त्यामुळे शिक्षकांचा पगार, इमारत मेंटेनन्स खर्च, वीज, पाणीबिल यासाठी पैसा लागतो. तो विद्यार्थ्यांच्या फीमधूनच वापरला जातो. पालकांना फी हप्त्या-हप्त्याने भरण्याची सवलत यापूर्वी दिली होती. मात्र, पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून फी भरली नाही. - मोनालिसा,
उपप्राचार्य, न्यू होरीजन पब्लिक स्कूल ऐरोली