शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वा-यावर, भरमसाट फी देऊनही पालक-विद्यार्थी भयग्रस्त वातावरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:37 AM2017-09-19T02:37:22+5:302017-09-19T02:37:25+5:30

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या (७) हत्येनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी भरमसाट फी मोजून पाल्याला चांगल्या नामांकित शाळेत घालण्याचा अट्टाहास करणा-या नवी मुंबईतील पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Parents-students in an alarmed environment even after securing the security of students in schools, paying a heavy fee | शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वा-यावर, भरमसाट फी देऊनही पालक-विद्यार्थी भयग्रस्त वातावरणात

शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वा-यावर, भरमसाट फी देऊनही पालक-विद्यार्थी भयग्रस्त वातावरणात

Next

प्राची सोनवणे 
नवी मुंबई : गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या (७) हत्येनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी भरमसाट फी मोजून पाल्याला चांगल्या नामांकित शाळेत घालण्याचा अट्टाहास करणा-या नवी मुंबईतील पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शाळकरी विद्यार्थी सुरक्षित आहेत का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पालक, सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटनांच्या वतीने केला जात आहे.
नवी मुंबईमध्ये प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण देणाºया २५५ शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाच्या ११३ शाळा असून त्यापैकी ११० खासगी कायम विनाअनुदानित शाळा आहेत. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तब्बल ९८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश शाळा रहिवासी परिसरामध्ये असून याठिकाणी विद्यार्थी वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
शहरातील काही शाळांची सुरक्षा भिंत तुटली असून शाळा परिसरात कच-याचा ढीग पडल्याचे दिसून आले. तर शाळा सुटल्यानंतर स्कूल बस तसेच व्हॅनमधून प्रवास करणाºया विद्यार्थ्यांना मात्र वा-यावर सोडल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्कूल बस भरेपर्यंत या ठिकाणी बसचालक तसेच शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची मुख्य रस्त्यावर पळापळ सुरु असल्याचे दिसून येते. स्त्यावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात, पण शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार कधी हे कोडे कायम असून तोपर्यंत विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला आहे.
महापालिका शाळेतील शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. खासगी शाळांची व्यवस्थापन समिती असून महापालिका यामध्ये सनियंत्रणाची भूमिका बजाविते. शाळांच्या दर्शनी भागात बाल हक्काविषयी फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, परिवहन समितीच्या बैठकीचे आयोजन व्हावे याविषयी देखील सूचना केली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये चांगला व वाईट स्पर्श याविषयी जनजागृती केली जात असून विद्यार्थी सुरक्षेच्या ठोस उपाययोजना राबविल्या जात आहेत.
- संदीप संगवे,
शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका
शहरातील निम्म्याहून अधिक शाळांमध्ये राज ठाकरे यांच्या पत्राचे वाटप करण्यात आले आहे. शहरातील शाळांमधील सुरक्षेबाबत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करताना बहुतांशी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरांची कमतरता असल्याचे दिसून आले तर वाहतूक समितींची नेमणूक न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळांमध्ये प्रथमोपचार पेटी, आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तपासणी मनविसेच्या वतीने करण्यात आली.
- सविनय म्हात्रे, अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटना
>काही शाळांच्या स्वत:च्या बस आहेत तर काही शाळा या कंत्राटी तत्त्वावर बस चालवितात. स्वत:च्या बस असणाºया शाळांचे या बसवर किमान काही प्रमाणात नियंत्रण असते मात्र कंत्राटी तत्त्वावर चालणाºया बसवर ना शाळांचा अंकुश असतो ना कंत्राटदारांचा. त्यामुळे या बसचालकांचा व मालकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून आले. शालेय वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीची पूर्तता होत आहे का याची पडताळणी केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका आहे.
>अशी हवी सुरक्षा
प्रत्येक मजल्यावरील मोकळा पॅसेज तसेच गच्चीकडे जाणाºया मार्गावर सीसीटीव्हीची निगराणी आवश्यक
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे पालक अथवा अधिकृत बस चालकांच्याच ताब्यात दिले जावे
फायर एक्सटेन्शनची सुविधा कार्यान्वित करणे आवश्यक
मुख्य प्रवेशद्वारावर हवा सीसीटीव्हीचा वॉच
बसमधील विद्यार्थ्यांची हजेरी घेणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे
विद्यार्थ्यांना बसमधून घरी सोडताना पालक अथवा जबाबदार व्यक्ती आल्याशिवाय रस्त्यावर एकट्याला सोडू नये.
शाळेभोवती संरक्षण भिंत असावी तसेच पूर्णवेळ सुरक्षा रक्षक असणे आवश्यक
>अशी आहे वाहतूक नियमावली
स्कूल बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, महिला सहायक असणे आवश्यक आहे.
वाहनचालकाकडे वैध परवाना तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र असावे.
बसचा रंग हा पिवळा असावा. त्याचप्रमाणे समोरील व मागील बाजूस ‘स्कूल बस’ किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणारे वाहन असे लिहिलेले असावे.

Web Title: Parents-students in an alarmed environment even after securing the security of students in schools, paying a heavy fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.