शासनाच्या दत्तक शाळा योजनेला पालकांचा ठेंगा; राज्यकर्त्यांचे डोळे उघडण्यासाठी भरवली रविवारी शाळा
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 22, 2023 05:28 PM2023-10-22T17:28:36+5:302023-10-22T17:28:46+5:30
शासनाने सरकारी शाळा दत्तक देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पालकांसह शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
नवी मुंबई : शासनाने सरकारी शाळा दत्तक देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पालकांसह शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. सरकारी शाळा खासगी ठेकेदारांच्या घशात गेल्यास गरिबांना शिक्षण अवघड होईल अशी पालकांना चिंता आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांचे डोळे उघडण्यासाठी महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये पालकांनी आंदोलन केले. तसेच रविवारी शाळा भरवून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळणे बंद करावा अशी हाक देण्यात आली.
जिल्हा परिषद, महानगर पालिका यांच्या शाळा दत्तक देण्याच्या हालचाली शासनामार्फत सुरु आहेत. मात्र या निर्णयाने नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत पडले आहेत. महापालिकेमार्फत सध्या चालवल्या जात असलेल्या शाळांमुळे गरीब कुटुंबातील मुले, मुली देखील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बरोबरीचे शिक्षण निशुल्क घेत आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा पालकांवरील मोठा आर्थिक भार हलका झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुले शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील नाव कमवत आहेत. अशातच महापालिकेच्या शाळा खासगी ठेकेदारांच्या घशात गेल्यास, कालांतराने पालकांवर आर्थिक भार पडू शकतो.त्यामुळे शासनाच्या शाळा दत्तक योजने विरोधात रविवारी महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांचे वर्ग भरले होते.
पालकांची व्यथा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी रविवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये रविवारी विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली तर पालकांनी शाळेबाहेर आंदोलन करून शासन निर्णयाविरोधात टाहो फोडला. घणसोली येथील पालिकेच्या शाळा क्रमांक ४२ बाहेर जमलेले पालक जितेश केळकर, कविता जाधव, जया सूर्यवंशी यांनी आपले अश्रू ढाळत सरकारच्या निर्णयाचा संताप व्यक्त केला. गोरगरिबांना शिकवणाऱ्या शाळांचे देखील खासगीकरण झाल्यास आम्ही मुलांना शिकवायचे कसे असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. यावेळी महापालिकेच्या सर्वच शाळांमधील शिक्षकांनी देखील पालकांच्या आंदोलनाला साथ देत रविवारी शाळा सुरु ठेवल्या.