१४ वर्षांनी मिळाले पालकांचे छत्र
By admin | Published: February 1, 2016 01:45 AM2016-02-01T01:45:58+5:302016-02-01T01:45:58+5:30
वयाच्या अवघ्या दोन ते तीन वर्षांपासून बाल आश्रमात वाढलेल्या तीन मुलांना तब्बल १४ वर्षांनी पालकांचे छत्र मिळाले आहे. अनाथ म्हणून वाढत असलेल्या या
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
वयाच्या अवघ्या दोन ते तीन वर्षांपासून बाल आश्रमात वाढलेल्या तीन मुलांना तब्बल १४ वर्षांनी पालकांचे छत्र मिळाले आहे. अनाथ म्हणून वाढत असलेल्या या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाला
यश आले आहे. पोलिसांच्या या प्रयत्नामुळे या मुलांचा वनवास संपला आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागामुळे सहा मुलांना पालकांचे छत्र मिळाले आहे. त्यापैकी तीन मुलांनी प्रथमच वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षी स्वत:च्या आई-वडिलांना पाहिले आहे. ही सर्व मुले दोन ते तीन
वर्षांची असतानाच वेगवेगळ्या कारणाने बाल आश्रमात आलेली होती.
राज्यात सध्या सुरू असलेल्या मुस्कान आॅपरेशनअंतर्गत गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस त्या ठिकाणी अनाथ मुलांच्या चौकशीसाठी गेले होते. यावेळी तेथील ११ मुले जन्मानंतर बाल आश्रमात कशाप्रकारे पोचली, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, उपनिरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली.
अनाथ म्हणून वाढत असलेल्या या मुलांच्या पालकांचा शोध घेण्याकरिता त्यांनी रायगडमधील त्या वादग्रस्त आश्रमाच्या देखील काही फायली हाताळल्या. त्यामध्ये मुंबईतील काही व्यक्तींची माहिती मिळाली. त्यांनीच या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून आणून त्या आश्रमात ठेवले होते. यानुसार
तब्बल १२ ते १३ वर्षांनी प्रथम
त्यांच्या घरी पोलीस धडकले. चौकशीत त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे एक एक
धागा जोडत पोलिसांनी तीन
मुलांच्या जन्मापासूनचा इतिहास उलगडला.
कुटुंबातल्या अनेक घडामोडींमुळे ही मुले वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीच पालकांपासून दुरावलेली होती. त्यापैकी काही मुलांच्या पालकांनी त्यांच्या मुलांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केलेला. परंतु रायगडच्या ज्या बाल आश्रमात ही मुले वाढत होती तो आश्रम विनापरवाना चालवला जात होता. यामुळे त्या मुलांची नोंदच पोलिसांकडे झालेली नव्हती. परंतु हे सर्व अडथळे दूर करीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या मुलांना पालकांची भेट घालून दिली.
इतक्या वर्षांनी आपल्याला आई-वडील भेटत आहेत, यावर
प्रथम त्या मुलांचा विश्वास नव्हता. मात्र प्रत्यक्ष भेटीत त्या मुलांनी पालकांच्या चेहऱ्याशी स्वत:चा चेहरा जुळवत आनंदाश्रू ढाळले. बालकल्याण समितीच्या सूचनेनुसार या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सध्या त्या बाल आश्रमाकडे असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात दिलेले नाही. मात्र महिन्यातून एकदा त्यांना भेटण्याची मुभा पोलिसांनी समितीकडून मिळवून दिली आहे, याचाच आनंद त्यांना गगनात मावेनासा झाला आहे.