नवी मुंबई : महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. येथील खेळणी तुटली असून ऐतिहासिक बुरूज ढासळू लागला आहे. रोडचे काम करण्यासाठी वृक्ष तोडण्यात आले असून उद्यानाच्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. महापालिका मुख्यालयासमोर बेलापूर किल्ल्याचा भाग असलेला टेहळणी दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच पालिकेने उद्यान विकसित केले आहे. छोट्याशा उद्यानामध्ये मुलांसाठी खेळणी व आकर्षक कारंजा तयार करण्यात आला होता; परंतु त्यांची देखभाल केली नसल्याने कारंजे कधीच बंद पडले आहेत. अर्धी खेळणी तुटली आहेत. नागरिकांना बसण्यासाठी टाकलेली बाकडी तुटली आहेत. या रोडचे रुंदीकरण करण्यासाठी उद्यानाच्या काठावरील मोठे वृक्ष तोडले आहेत. वृक्षाच्या फांद्या उद्यानामध्ये टाकल्या आहेत. वृक्षतोड करताना बाकडे तुटले आहेत. उद्यानामध्ये बांधकाम साहित्यही ठेवण्यात आले आहे. पेव्हर ब्लॉकसह इतर साहित्य ठेवल्याने येथे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांची गैरसोय होत आहे. ठेकेदाराने वृक्षतोड करताना उद्यानाचे नुकसान केले असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे; पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. उद्यानाच्या समोरच बेलापूर किल्ल्याचा टेहळणी दरवाजा आहे. या दरवाजाचीही देखभाल केली जात नाही. त्यामध्ये वृक्षाच्या फांद्या गेल्या आहेत. आतमधील छत कधीही कोसळू शकते. नवी मुंबईमध्ये २०० उद्याने आहेत. अनेक उद्यानांच्या सुशोभीकरणावर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत; पण महापालिका मुख्यालयासमोरील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्यानाच्या पुढील बाजूला एनआरआय पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त येत असतात. कामासाठी वेळ असल्यास अनेकांची पावले या उद्यानाकडे वळत आहेत; पण तेथे बसण्यासाठी जागाच नसल्याने निराश होऊन परत जावे लागत आहे. रोज सकाळी बेलापूर किल्ल्यावर शेकडो नागरिक व्यायामासाठी जात असतात. चालणे व धावण्याचा व्यायाम केल्यानंतर येथे विश्रांतीसाठी काही वेळ थांबत असतात, त्यांचीही गैरसोय होत आहे. पालिका प्रशासनाने उद्यानाचे सुशोभीकरण करावे, अशी मागणीही नागरिक करू लागले आहेत.नागरिकांची नाराजी महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिका मुख्यालयाला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती; परंतु मुख्यालयाच्या समोरच असलेल्या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करण्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असून, तेथील उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यालयासमोरील उद्यानाची झाली दुरवस्था
By admin | Published: May 02, 2017 3:27 AM