नेरळमधील उद्यानाची दुरवस्था
By Admin | Published: May 22, 2017 02:13 AM2017-05-22T02:13:47+5:302017-05-22T02:13:47+5:30
सध्या सर्वत्र शाळांना सुट्या लागल्याने मुले वेगवेगळे खेळ खेळण्यात मग्न झालेले दिसतात. नेरळमधील अनाजी दळवी पार्कमध्ये सकाळी, सायंकाळी मुले खेळण्यासाठी येतात
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : सध्या सर्वत्र शाळांना सुट्या लागल्याने मुले वेगवेगळे खेळ खेळण्यात मग्न झालेले दिसतात. नेरळमधील अनाजी दळवी पार्कमध्ये सकाळी, सायंकाळी मुले खेळण्यासाठी येतात. तसेच ज्येष्ठ नागरिकही सायंकाळी या उद्यानात येतात; परंतु उद्यानाची दुरवस्था झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
बाकडे तुटलेले असल्याने बसण्यासाठी जागा नाही. घसरगुंडीही तुटली असल्याने मुलांना खेळताना जखमी होण्याची भीती आहे. संरक्षक जाळीही तुटली आहे. पार्कमध्ये खेळण्याच्या साहित्याची कमतरता आहे. वारंवार तक्रार करूनही नेरळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ गणपती घाटाजवळ अनाजी दळवी पार्क आहे. दळवी यांनी अनेक वर्षांपूर्वी ही जागा ग्रामपंचायतीला दिली आहे. त्यामुळे या पार्कची देखभाल करणे नेरळ ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे; परंतु याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. या पार्कमध्ये सकाळ, संध्याकाळ बच्चे कंपनी व ज्येष्ठ नागरिक येत असतात. येथे बाकडे, घसरगुंडी, झोपाळा या साहित्यांची सोय करण्यात आली आहे; परंतु हे साहित्य आता मोडकळीस आले आहे, तसेच उद्यानाचे मुख्य गेट नेहमीच बंद असल्याने गेटवर अनेकांचे बॅनर झळकत असतात. आसन व्यवस्थेची कमतरता असल्याने अनेक ज्येष्ठ मंडळींना ताटकळत उभे राहावे लागते किंवा नाइलाजास्तव खाली बसावे लागत आहे.
पार्कमधे नियमित साफसफाई करण्यात येत नसल्याने, पाला पाचोळा व कचरा जमा झाला आहे. पार्कला लागूनच गणपतीघाट असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथे येणारे नागरिक दुर्गंधीमुळे हैराण आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पार्कला संरक्षक जाळी बसविण्यात आलेली नाही. जवळच कर्जत-कल्याण मुख्य रस्ता असल्याने खेळताना मुले रस्त्यावर आली, तर अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे पार्कमधील गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.