पार्किंगची माहिती मिळणार एका क्लिकवर, खासगी तत्वावर विकसित करणार वाहनतळ

By नारायण जाधव | Published: September 4, 2023 06:46 PM2023-09-04T18:46:14+5:302023-09-04T18:46:26+5:30

राजेश नार्वेकर यांचा निर्णय : पार्किंग समस्या निघणार निकाली

Parking information will be available on one click, the parking lot will be developed on a private basis | पार्किंगची माहिती मिळणार एका क्लिकवर, खासगी तत्वावर विकसित करणार वाहनतळ

पार्किंगची माहिती मिळणार एका क्लिकवर, खासगी तत्वावर विकसित करणार वाहनतळ

googlenewsNext

नवी मुंबई : झपाट्याने विकसित होणार्या नवी मुंबई शहरात वाढत्या लाेकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या ही तीव्र गतीने वाढत आहे. यामुळे शहरात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपायशोधण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून आता स्वत:चा पैसा खर्च करता पीपीपी तत्त्वावर पार्किंगसाठी बहुमजली वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शहरात कुठे पार्किंग उपलब्ध आहे, किती वाहने उभी करू शकतो, याची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी खास ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईतील पार्किंगची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने विभागवार मायक्रोप्लॅनिंग केले जात आहे. यासोबतच सिडकोकडून पार्किंग प्लॉट उपलब्ध करून घेणे. तसेच मिळालेले प्लॉट पार्किंगच्या दृष्टींने विकसित करण्यावर लक्ष केले आहे.

सीबीडीत ५१७ वाहनांच्या पार्किगची झाली सोय
१ - यामध्ये आतापर्यंत सीबीडी बेलापूर सेक्टर १५ ए सीबीडी येथे पार्किंगकरिता बहुमजली इमारत बांधली असून तेथे १२१ दुचाकी व ३९६ चार चाकी उभी करता येणार आहेत. हा संपूर्ण परिसर विविध कार्यालये आणि वाणिज्य संस्था यांनी गजबजलेला असल्याने या पार्किंग इमारतीमुळे मोठया प्रमाणावर वाहने पार्किंगसाठी फायदा होणार आहे.
२- अशाच प्रकारे आणखी एक ६९०० चौ.मी.चा भूखंड सेक्टर १५, सीबीडी बेलापूर येथे तसेच ११ हजार चौ.मी. चा भूखंड सेक्टर ३० वाशी येथे उपलब्ध झाला असून या दोन्ही भूखंडावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पीपीपी तत्वावर पार्किंग (सार्वजनिक खाजगी भागिदारी) विकसित करण्याचे नियोजन केले आहे.

गतीमान कार्यवाहीसाठी बैठका
अशा कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च होत असतो. यादृष्टीने या दोन्ही भूखंडावरील पार्किंग व्यवस्था पीपीपी तत्वावर विकसित करण्याचे नियोजन केले असून गतीमान कार्यवाहीसाठी वारंवार आढावा बैठकांचे घेऊन अडचणी दूर करण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे.

आर्थिक सल्लागार नेमणार
दोन्ही पार्किंग भूखंडावरील पार्किंग व्यवस्थेच्या नियोजनाबाबत आर्थिक व्यवहार सल्लागार यांची नेमणूक करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला मान्यताप्राप्त संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून याव्दारे नेमणूक होणा-या सल्लागारांच्या रिपोर्टनुसार पीपीपी तत्वावर पार्किंगचे नियोजन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

माहितीसाठी ॲप विकसित करणार
शहरातील पर्यटक वाहन चालकांनाही कोणते पार्किंग लॉट उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध होण्याकरिता स्वतंत्र ॲप विकसीत केले जात असल्याचे सांगून नार्वेकर यांनी वाहन पार्किंगच्या योग्य जागीच आपले वाहन उभे करावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Web Title: Parking information will be available on one click, the parking lot will be developed on a private basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.