रोडपालीतील बस टर्मिनलवर अवजड वाहनांचे पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:45 PM2019-05-30T23:45:53+5:302019-05-30T23:46:05+5:30
सिडको, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : लाखो रुपये खर्चूनही टर्मिनल वापराविना
कळंबोली : रोडपाली येथे बांधण्यात आलेले बस टर्मिनल धूळखात पडून आहे. सिडको आणि एनएमएमटीतील समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सिडकोने लाखो रुपये खर्च करूनही जागेचा वापर सुरू झालेला नाही. सध्या या ठिकाणी अवजड वाहने बेकायदेशीर उभी केली जात आहेत.
कळंबोली वसाहतीत सिडकोची परिवहन सेवा सुरू होती, तेव्हाच बस टर्मिनल बांधण्यात आले होते. करवली चौकाच्या जवळ असणारे बस टर्मिनल परिसरात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी बस वळवण्याकरिताही जागा मिळत नाही. त्यामुळे बसचालक, खासगी वाहनचालक, पादचारी, स्थानिक आणि एनएमएमटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. या बस थांब्याला पर्याय म्हणून सिडकोने पाच वर्षांपूर्वी डी-मार्टपासून काही मीटर अंतरावर नव्याने बस टर्मिनल उभारले. हे ठिकाण नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या रस्त्यावर असल्याने महत्त्व प्राप्त झालेले आहे.
सिडकोने लाखो रुपये खर्च करून टर्मिनल उभारले असले, तरी सध्यातरी या ठिकाणी एनएमएमटीची बस येत नाही. त्यामुळे या जागेवर अवजड वाहने बेकायदेशीरपणे उभी केली जातात. हे बस टर्मिनल कधी सुरू होणार, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
बस टर्मिनल उभारताना सिडकोने या ठिकाणी स्वच्छतागृह बांधले. मात्र, वापराविना त्याचीही दुरवस्था झाली आहे.
रोडपालीतील बस टर्मिनलमध्ये अवजड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या संदर्भात वाहतूक विभागाकडून सिडकोला पत्रही देण्यात आले आहे. दोन दिवसांत कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल. - अंकुश खेडकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा कळंबोली