पनवेल : खारघर रेल्वे स्थानकावर वाहने उभी करण्यासाठी स्थानकाच्या छतावर वाहनतळासाठी केलेली सोय अपुरी पडत आहे. त्यामुळे वाहनतळाची सोय करण्यात यावी, तसेच भविष्यात वाढती प्रवासी संख्येचा विचार करून खारघर ते मानसरोवर दरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून, तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे निवेदन देऊन देण्यात आले.
राज्य शासनाने नवी मुंबई निर्मिती करताना हार्बर रेल्वे मार्गावर सिडकोने वाशी ते पनवेल दरम्यान उभारलेल्या छतावर वाहनतळ उभारलेले खारघर रेल्वे स्थानक हे छतावर वाहनतळ उभारलेले पहिले वाहनतळ आहे. सिडकोने खारघर वसाहत उभारताना ४० सेक्टर आणि येथील लोकसंख्येचा विचार केल्याचे दिसून येत नाही. खारघर स्थानकावरून रोज एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तर छतावर असलेल्या वाहनतळावर जवळपास चार हजार वाहने दाटीवाटीने उभी केली जात आहेत, तर काही प्रवासी रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत.
मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्सच्या धर्तीवर सिडकोने खारघर परिसरातील सेन्ट्रल पार्क समोरील जागेवर कॉर्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे भविष्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येची वाढ होणार आहे, त्यामुळे भविष्यात खारघर स्थानकावर वाहने उभी करण्याचा प्रश्न गंभीर होणार असून, सिडको आणि रेल्वे विभागाने खारघर स्थानकावर वाहनतळासाठी नवीन जागा उपलब्ध करून द्यावी. भविष्यात कामोठे आणि खारघरच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सिडको आणि रेल्वे मंत्रालयाने खारघर आणि मानसरोवर दरम्यान नवीन स्थानकाची उभारणी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सेनेच्या शिष्टमंडळात उपशहर प्रमुख रामचंद्र देवरे, आप्पा वारंग, संतोष जाधव, उत्तम मोर्बेकर आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.