वाशी विभागात पार्किंगचा प्रश्न झालाय गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:43 PM2020-02-27T23:43:42+5:302020-02-27T23:43:51+5:30
जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न जैसे थे; बेकायदा बांधकामांमुळे पायाभूत सुविधांवर ताण
नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबई शहराची उभारणी केली. त्याची सुरुवात वाशी नोडपासून करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाशी विभागाला विशेष महत्त्व आहे. मात्र, या विभागात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. वाहनतळाचे नियोजन न झाल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. पार्किंगची प्रमुख समस्या असली तरी या विभागातील अनेक नागरी प्रश्न जैसे थे आहेत. विशेषत: सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षे रेंगाळला आहे. त्याशिवाय फेरीवाल्यांचा प्रश्नसुद्धा तितकाच ज्वलंत बनला आहे.
महापालिकेच्या वाशी विभागांतर्गत जुहूगाव, वाशी गाव आणि कोपरी गावांचा समावेश करण्यात आला आहे. या विभागात शहरी भागाचे प्रमाण अधिक आहे. येथील वसाहती प्रशस्त असल्या तरी रस्ते अरुंद आहेत. मागील २५ वर्षांत वाशी विभागाचा विस्तार झाला. मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण झाल्या, लोकसंख्या वाढली. उद्योगधंदे वाढीस लागले आहेत. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागा मिळेल तेथे मनमानी पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. प्रमुख रस्त्यांच्या कडेला दुतर्फा अशा प्रकारची बेकायदा पार्किंग दिसून येते. प्रमुख रस्ते, पदपथ तसेच शहरातील सार्वजनिक जागा अपुऱ्या पडू लागल्याने आता वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांवरही बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जातात. त्याचा फटका परिसरातील दळणवळण यंत्रणेला बसत आहे. निवासाच्या ठिकाणी किंवा इमारतीत पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने अंतर्गत रस्त्यावर रहिवासी आपली वाहने उभी करतात; परंतु आता त्यात अवजड वाहनांची भर पडत आहे.
वाशी विभागात पार्किंगची प्रमुख समस्या असली तरी येथे अनेक प्रलंबित प्रश्न जैसे थे आहेत. सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे. त्याशिवाय सुरुवातीच्या काळात खासगी व्यावसायिकांनी बांधलेल्या इमारतींचीही पडझड सुरू झाली आहे. जुहुगाव, वाशीगाव आणि कोपरी गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यामुळे या गावांचे गावपण हरवले आहे. अनियोजित बांधकामांमुळे गावातील रहदारीचे रस्ते अरुंद झाले आहेत. पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गाव क्षेत्रातील दैनंदिन साफसफाईची कामे योग्य पद्धतीने केली जात नाहीत. कचºयाची विल्हेवाट लावताना संबंधित यंत्रणेची दमछाक होते. तसेच अनधिकृत घरांमध्ये विविध प्रांतातून आलेल्या भाडेकरूंचे प्रमाण अधिक आहे.
महापालिकेची मोहीम ठप्प
वाशी विभागात रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफसफाई करणाºया सफाई कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाहनांचा अडथळा येत असल्याने रस्त्यांची योग्य पद्धतीने सफाई करता येत नाही. त्याचा ठपका संबंधित कर्मचाºयांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता; परंतु महापालिकेची ही मोहीमही ठप्प पडली आहे.
नो पार्किंगच्या फलकाकडे दुर्लक्ष शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. या फलकाकडे दुर्लक्ष करीत वाहनधारक सर्रासपणे येथे आपली वाहने उभी करतात. या प्रकाराकडे वाहतूक विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने परिसरातील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.