नेरळमध्ये पार्किंगची समस्या गंभीर
By admin | Published: April 5, 2016 01:32 AM2016-04-05T01:32:49+5:302016-04-05T01:32:49+5:30
शहरात तसेच नेरळ रेल्वे परिसरात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने त्याचा त्रास प्रवासी व पादचाऱ्यांना होत आहे
नेरळ : शहरात तसेच नेरळ रेल्वे परिसरात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने त्याचा त्रास प्रवासी व पादचाऱ्यांना होत आहे. त्यामुळे नेरळ शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असून रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरात वाहनतळ उभारावे, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
नेरळ शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच नेरळ शहरातील अरुंद रस्त्यांमुळे बाजारपेठेत तसेच रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आपल्या दुचाकी रेल्वे परिसरातच पार्क करून ठेवत आहेत. त्यामुळे या परिसरातून ये -जा करताना प्रवाशांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना रेल्वे प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करत नाहीत. काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशनलगत पार्ककेलेल्या गाड्यांवर कारवाई केली होती. परंतु त्यानंतर स्टेशन परिसरात काही अंतरावर दुचाकी पार्ककेल्या जात आहेत.
दीड वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे परिसरात वाहनतळ उभारण्यात आले होते. परंतु काही महिन्यात हे वाहनतळ बंद करण्यात आले. तेव्हापासून येथे दुचाकी अस्ताव्यस्त पार्क केल्या जातात. तसेच येथे पार्ककेलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेची कोणतीच हमी नसताना येथे वाहने पार्क केली जातात. नेरळ शहरातून काही महिन्यांपासून अनेक दुचाकींची चोरी झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. परंतु सुरक्षेची कोणतीही हमी नसताना वाहनचालक आपली वाहने रेल्वे पार्ककरून ठेवत आहेत. रेल्वे परिसरात उभ्या केलेल्या दुचाकीमधील अनेक वेळा पेट्रोल काढण्याच्या व अनेक पार्ट काढण्याच्याही घटना घडल्या आहेत.
नेरळ रेल्वे परिसरात दररोज शेकडो दुचाकी पार्क केल्या जात आहेत. यावर रेल्वे प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रास रेल्वेमधून येणाऱ्या प्रवासी व पादचाऱ्यांना होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने वाहनांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेच्या जागेत वाहनतळ उभारावे, अशी मागणी प्रवासी व स्थानिकांकडून होत आहे. (वार्ताहर)