सीवूड रेल्वेस्टेशन बाहेरील पार्किंगची समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:32 AM2017-08-13T03:32:24+5:302017-08-13T03:32:24+5:30
सीवूड रेल्वेस्टेशनच्या नवीन इमारतीमुळे या परिसराला समस्यांचा विळखा पडू लागला आहे. पश्चिमेला वाहतुकीची समस्या गंभीर झाली असून, एनएमएमटीच्या बसथांब्यासह रोडवर खासगी वाहने उभी केली जात आहेत.
नवी मुंबई : सीवूड रेल्वेस्टेशनच्या नवीन इमारतीमुळे या परिसराला समस्यांचा विळखा पडू लागला आहे. पश्चिमेला वाहतुकीची समस्या गंभीर झाली असून, एनएमएमटीच्या बसथांब्यासह रोडवर खासगी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
सिडकोने हार्बर मार्गावर १६.५ हेक्टर जमिनीवर भव्य सीवूड रेल्वेस्टेशनचे बांधकाम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असून, सीवूड ग्रँड मॉलही सुरू केला आहे. उर्वरित व्यावसायिक गाळे अद्याप सुरू केलेले नाहीत. मॉलमुळे येथे खरेदी करण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खासगी वाहने रोडवरच उभी केली जात आहेत. जोशी चौकापासून ते सीवूड पूर्व व पश्चिमेला जोडणाºया उड्डाणपुलापर्यंत रोडच्या बाजूला खासगी वाहने सुरू केली जात आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी दोन ठिकाणी एनएमएमटीचे बसथांबे सुरू केले आहेत; पण त्या थांब्यावरही खासगी वाहने उभी केली जात आहेत. वास्तविक रेल्वेस्टेशन इमारतीमध्ये वाहनतळाची सोय आहे; पण त्या वाहनतळाची फारशी माहिती नागरिकांना मिळत नाही. याशिवाय पाच ते दहा मिनिटांच्या कामासाठी वाहनतळामध्ये वाहने उभी करण्यापेक्षा रोडवर वाहने उभी करण्यासच पसंती दिली जात आहे. या सर्वांचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
सीवूड रेल्वेस्टेशनच्या व्यावसायिक इमारतीचा फटका आता या परिसरातील नागरिकांना बसू लागला आहे. वाहनांचा कर्णकर्कश आवाज, रोडवरील अनधिकृत पार्किंग यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊ लागला आहे.
रेल्वे, सिडको, महापालिका व वाहतूक पोलीसही या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात पार्किंगवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सीवूड रेल्वेस्टेशन व्यवस्थापनाने अधिकृत वाहनतळामध्येच वाहने उभी राहतील, याची काळजी घ्यावी. रेल्वे व्यवस्थापन, महापालिका, सिडको व वाहतूक पोलिसांनी पार्किंगचे योग्य नियोजन करून वाहतूककोंडी व समस्या होणार नाही, याची काळजी घ्यावी. एनएमएमटीच्या थांब्यावरही वाहने उभी केली जाऊ नयेत.
- समीर बागवान,
परिवहन समिती सदस्य,
शिवसेना