वाढले पार्किंगचे दर; दर्शकांच्या खिशाला कात्री, ‘कोल्ड पे’ आयोजकांची कोटींची उड्डाणे
By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 18, 2025 09:39 IST2025-01-18T09:38:54+5:302025-01-18T09:39:01+5:30
मुंबई, नवी मुंबईसह लगतचे प्रेक्षक वगळता इतरांकडून भाड्याच्या कार, टॅक्सीचा वापर होणार आहे.

वाढले पार्किंगचे दर; दर्शकांच्या खिशाला कात्री, ‘कोल्ड पे’ आयोजकांची कोटींची उड्डाणे
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची पार्किंगमधून लूट करण्याची नियोजनबद्ध रचना करून खासगी वाहनाने येणाऱ्यांसाठी ७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. यात स्टेडियम लगतची तीन ठिकाणे सशुल्क असणार आहेत. त्यांचे दर हे तासनिहाय बदलत असल्याने पार्किंगच्या माध्यमातूनही दर्शकांना खिशाला मोठी कात्री बसणार आहे.यातून आयोजकांनी पार्किंगमधून कोटींची उड्डाणे घेतली आहेत.
मुंबई, नवी मुंबईसह लगतचे प्रेक्षक वगळता इतरांकडून भाड्याच्या कार, टॅक्सीचा वापर होणार आहे. परंतु, तिकीट विक्रीवरून १० ते १२ टक्के प्रेक्षक मुंबई व लगतचे आहेत. त्यापैकी अडीच ते तीन हजार प्रेक्षक, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, उद्योजक खासगी वाहनाने येण्याची अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी खारघर, नेरूळ, सीबीडी येथे ७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. तीन वाहनतळे सशुल्क आहेत. स्टेडियम जवळच्या तीन वाहनतळ वापरण्यासाठी ऑनलाइन आगाऊ बुकिंग ठेवली आहे.
खासगी बस, कारचा आधार
मोबाइल ॲपद्वारे चालणाऱ्या खासगी बस, टॅक्सी यांचीही कोल्ड प्ले आयोजकांनी जुळवणी केली आहे. कार्यक्रमासाठी येणारी भाडी त्यांच्यामार्फत हाताळली जाणार असून, त्यांना तिकिटानुसार कोणत्या गेटवर सोडायचे याची कल्पनाही व्यावसायिक बस, कारचालकांना देण्यात आली आहे.
स्टेडियमभोवती १७ क्रेनची व्यवस्था
स्टेडियमकडे येणाऱ्या मार्गावर, तसेच परिसरातील रस्त्यावर एखादे वाहन बंद पडल्यास, पार्किंग केल्यास वाहतूककोंडी होऊ शकते. हे टाळण्यासाठी स्टेडियमभोवती १७ क्रेनची व्यवस्था केली आहे.
गोरेगाव ते नेरूळ लोकल
कोल्ड प्ले काळात गोरेगाव ते नेरूळ या मार्गावर विशेष लोकल चालवली जाणार आहे. १८ व १९ तारखेला दुपारी २ वाजता गोरेगाव येथून ट्रेन सुटणार आहे. रात्री ११ वाजता नेरूळमधून ती गोरेगावला जाणार आहे. २१ तारखेला गोरेगाव येथून दुपारी २ व ३ वाजता दोन ट्रेन धावणार असून, रात्री १०:४५ व ११ वाजता नेरूळ ते गोरेगाव अशी ट्रेन धावणार आहे.
तीन दिवसांत दीड कोटींची उलाढाल
तिन्ही ठिकाणी सुमारे अडीच हजार वाहने पार्किंग होऊ शकतात. त्यामुळे आपापल्या वाहनांची पार्किंग निश्चित करण्याची स्पर्धा लावून आगाऊ बुकिंगच्या माध्यमातून हात धुवून घेतला जात आहे.
दुपारी ४९९ रुपयांवर असलेले शुल्क संध्याकाळी ६९९ रुपये झाले होते. तर, रात्री ते १,२९९ रुपये इतके केले. यामुळे तीन दिवसांत केवळ वाहनतळाच्या माध्यमातूनच सव्वा ते दीड कोटी रुपये आयोजकांच्या खिशात जाणार असल्याचा अंदाज आहे.