योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिकेच्या माध्यमातून शहरात विकसित करण्यात आलेल्या उद्यानांना बच्चे कंपनीसह नागरिकांनी पसंती दिली असून, या उद्यानामध्ये नागरिकांची गर्दी असते. शहरातील उद्यानांची गुणवत्ता राखण्यासाठी उद्यानांची सुरक्षा यासह सर्वसमावेशक वार्षिक संवर्धन व संरक्षण करण्याकरिता एकत्रित कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच अनेक उद्यानांच्या नूतनीकरणाची कामे देखील करण्यात येणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील १९७ उद्याने, २५२ रस्ता दुभाजक, ट्री बेल्ट व मोकळ्या जागा यांच्या स्थापत्यविषयक व विद्युत विषयक बाबी तसेच उद्यानांची सुरक्षा यासह सर्वसमावेशक वार्षिक संवर्धन व संरक्षण करण्याकरिता एकत्रित कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. नेरुळ विभागातील सेक्टर १८ येथील शांताराम भोपी उद्यान, सेक्टर ११ मधील स्टेप गार्डन, सेक्टर ३ येथील चाचा नेहरू उद्यान, सेक्टर ११ येथील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान, जुईनगर सेक्टर २४ येथील सार्वजनिक उद्यान, सेक्टर १९ येथील स्व. आर. आर. पाटील उद्यान, तुर्भे विभागातील संत शिरोमणी तुकाराम महाराज उद्यान, सानपाडा सेक्टर ७ येथील उद्यान, कोपरखैरणे सेक्टर २२ येथील उद्यान, ऐरोली सेक्टर १० मधील यशवंतराव चव्हाण उद्यान आदी उद्यानांचे नूतनीकरण करण्यात येणार असून वाशी सेक्टर-१० येथील स्वामी नारायण मंदिर ते जुहूगाव स्मशानभूमी असा ट्री बेल्ट विकसित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये खेळणी व बेंचेस बसविणे व ओपन जीम साहित्य बसविण्याकरिता तसेच सद्य:स्थितीत असलेली खेळणी व ओपन जीम साहित्य नादुरुस्त झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी वार्षिक दरकराराद्वारे पॅनल तयार करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सर्व उद्यानांचे सर्वेक्षण करून प्राधान्यानुसार उद्यानांतील खेळणी व ओपन जीम साहित्य दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. यामुळे शहरातील उद्यानांच्या आकर्षणात आणखी भर पडणार आहे.
४२,८०० वृक्षांची लागवड
मोरबे धरण क्षेत्रातील वडविहीर, बोरगाव व कोयना वसाहत परिसर तसेच सी.बी.डी., नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या ठिकाणी विविध भारतीय प्रजातींचे नारळ, बकुळ, निम, काजू, कदंब, ताह्मण, सुपारी अशी एकूण ४२ हजार ८०० वृक्ष लागवड करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.सीएसआर निधीमधून सुशोभीकरणएम.आय.डी.सी. क्षेत्रातील १६ कंपन्यांना २५ ठिकाणचे रस्ता दुभाजक व चौक सीएसआर निधीमधून सुशोभीकरण करण्याकरिता देण्यात येत आहेत.