नवी मुंबई : वाशी सेक्टर 8 मधील पंप हाऊसजवळ असलेला पादचारी पुलाचा काही भाग रात्री 8 वाजता कोसळला. अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पालिका प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे. सर्वेश पाल व जितेंद्र पाल अशी जखमींची नावे आहेत. मिनी सीशोर व सागर विहारला जोडण्यासाठी होल्डिंग पाँडला लागून सिडकोने 20 वर्षापूर्वी पादचारी पूल बांधला होता. या परिसरामध्ये सकाळी व सायंकाळी हजारो नागरिक फिरण्यासाठी येत असतात. 8 वाजता पुलावरून काही जण जात असताना अचानक पुलाचा भाग कोसळला. दोन जण खाली पडून जखमी झाले आहेत. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी जवळच्या महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. येथील पंप हाउस व पादचारी पूल धोकादायक झाला असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार सभागृहात केली होती. प्रशासनाने वेळेत दुरुस्तीचे काम केले नाही. सध्या या पुलाच्या संरचनात्मक लेखा परीक्षणाचे काम सुरू होते. पूल कोसळल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
वाशीत पादचारी पुलाचा भाग कोसळला; दोन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 9:43 PM