उरणमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:21 AM2017-07-21T03:21:24+5:302017-07-21T03:21:24+5:30

उरण परिसरातील जेएनपीटी बंदराच्या आणि गोदामांच्या उभारणीनंतर उरलेल्या विविध खाड्या, जलाशये आणि पाणथळ जागांवर फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत.

Participants crowd to see flamingos in Uran | उरणमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची गर्दी

उरणमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : उरण परिसरातील जेएनपीटी बंदराच्या आणि गोदामांच्या उभारणीनंतर उरलेल्या विविध खाड्या, जलाशये आणि पाणथळ जागांवर फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत. स्वैर विहार करीत विविध जलाशयात बागडणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आकर्षक छबी टिपण्यासाठी आणि विलोभनीय फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची सध्या गर्दी वाढू लागली आहे. एरव्ही पावसाळा सुरू होताच माघारी परतणारे फ्लेमिंगो उरण परिसरात यावर्षी वास्तव्य वाढल्याने पक्षिप्रेमी सुखावले आहेत.
उरण परिसरात विस्तीर्ण जलाशय, खाड्या आणि पाणथळ जागी स्थलांतरित दुर्मीळ जलचर पक्ष्यांची नेहमीच गर्दी असते. जलाशय, खाड्यात शेवाळ, प्रवाळ, खुबे, छोटे-मोठे मासे, कृमी कीटक, शंख शिपले विपुल प्रमाणात खाद्य मिळत असल्याने विविध जातीचे, विविध रंगांचे आकर्षक लाखोंच्या संख्येने स्थलांतरित आणि जलचर पक्षी थव्याथव्यांनी आणि मोठ्या संख्येनी उरण परिसरात येत असतात. यामध्ये प्रामुख्याने फ्लेमिंगो, पेलिकन, करकोचा, माळढोक आणि इतर अनेक जातींच्या जलचर पक्ष्यांचा समावेश आहे. विस्तीर्ण जलाशये, खाड्या, पाणथळ जागांवर विविध जलचर दुर्मीळ पक्ष्यांची होणारी गर्दी आणि त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पक्षिप्रेमींची उरण परिसरात विविध ठिकाणी रेलचेल असते.
डोंगणी-पाणजे खाडीतील फ्लेमिंगोंची गुलाबी छटा टिपण्यासाठी पक्षिप्रेमींची तर चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच जासई-दास्तान फाट्याजवळील जलाशय, जेएनपीटी-जासई रोड दरम्यानच्या पाणथळ जागांवरही फ्लेमिंगोंचे दर्शन होऊ लागले आहे. जेएनपीटी बंदरांतर्गत सध्या चौथ्या अवाढव्य बंदराचे काम वेगाने सुरू आहे. पाणजे-डोंगरी खाडीतच ५०० एकर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात माती-दगडाच्या भरावाचे काम सुरू आहे. त्यामुळे असे फ्लेमिंगो पाहण्याचा योग भविष्यात पुन्हा मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत.

फ्लेमिंगो आणि दृष्टीस पडणाऱ्या विविध जलचर पक्ष्यांची विविध ठिकाणची आश्रयस्थाने भरावामुळे बुजवली गेली आहेत.
चौथ्या बंदरामुळे डोंगरी-पाणजे खाडीतील फ्लेमिंगोंसाठी उरलेली आश्रयस्थानेही भरावात नष्ट होेत आहेत. त्यामुळे असे फ्लेमिंगो पक्षी पुन्हा पक्षिप्रेमींना पाहण्यास मिळतील की नाही, हे सांगणे कठीण.

Web Title: Participants crowd to see flamingos in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.