नवी मुंबई: मराठा आंदोलनासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून नागरिक सहभागी झाले होते. मराठवाड्यामधील नागरिकांचा यामध्ये विशेष सहभाग होता. मराठवाड्यामधील गावा - गावांमधील नागरिकांनी लोकवर्गणी काढून ग्रामस्थांना आंदोलनाला पाठविले आहे. ट्रकमध्ये जेवणापासून ते सर्व प्रकारचे साहित्य घेवून आंदोलन घरातून निघाले असून जेवण बनविण्यासाठीचीही संपूर्ण तयारी केली होती. मराठवाडा हा कायम दुष्काळी प्रदेश आहे. शेतीत पिकत नाही. रोजगाराची साधने नाहीत. कर्ज काढून मुलांना शिकविले तर नोकरी मिळत नाही. अशी अवस्था मराठ्यांची झाली आहे.
शेतकरी मराठा हालाखीचे जीवन जगत आहे. या गरजवंत मराठ्यांची व्यथा सरकारला दाखवून हक्काचे आरक्षण घेण्यासाठी आलो असल्याचे मत परभणीमधून आलेल्या ७० वर्षाच्या विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.आमच्या मुला, नातवांचे भविष्य सुखकर व्हावे यासाठी आम्ही या वयातही आंदोलनात सहभागी झालो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नांदेडवरून आलेल्या रेणूकाबाई तुपेकर यांनी सांगितले की १९ जानेवारीपासून आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत. आंदोलकांना स्वयंपाक बनविण्याचे काम आम्ही करतो. एखाद्या ठिकाणी जेवणाची सोय झाली नाही तर आम्ही आमची पर्याची व्यवस्था केली असून जेवन बनविण्याचे सर्व साहित्य सोबत आणले असल्याचे सांगितले.
हिंगोलीमधून आलेल्या नवनाथ देवरे यांनी सांगितले की शेती विकून मुलांना शिकवावे लागत आहे. शिकलेल्या मुलांनाही नोकरी मिळत नाही. अशा स्थितीमध्ये गरीब मराठ्यांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झत्तला आहे. आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून मराठा समाजाची माणसे आंदोलनात सहभागी झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लहान मुले, तरूण व वृद्ध नागरिकांचा सहभागही लक्षणीय होता.
या शहरांमधून आले होते आंदोलकआंदोलक हजारो वाहनांमधून नवी मुंबईमध्ये दाखल झाले. मोटारसायकल, ट्रक, टेंम्पो, जीप, ट्रॅक्टर मिळेल त्या वाहनाने आंदोलनात आले आहे. सर्वाधीक गर्दी परभणी, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड, औरंगाबाद, सोलापूर,मालेगाव, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धाराशीव,पिंपरी चिंचवड,बारामती, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा व इतर जिल्ह्यांमधून आलेल्या वाहनांची संख्या लक्षणीय होती. सर्वाधीक गर्दी मराठवाड्यातील नागरिकांची होती.