हॉटेल्समधील पार्ट्यांवर महसूलची नजर
By admin | Published: December 30, 2016 04:25 AM2016-12-30T04:25:46+5:302016-12-30T04:25:46+5:30
नववर्षाचे स्वागत धुंदीऐवजी शुध्दीत केले जावे, याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवायांवर
नवी मुंबई : नववर्षाचे स्वागत धुंदीऐवजी शुध्दीत केले जावे, याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवायांवर भर दिला जाणार आहे. पोलिसांसह महसूल विभागाचेही हॉटेलमधील पार्ट्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. जनजागृतीच्या उद्देशाने वाशीतील शिवाजी चौकात ३० व ३१ तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले असून अनेकांनी थर्टी फर्स्टचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहरातील हॉटेल्स, सोसायट्या यासह इतर अनेक ठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्ट्या रंगणार आहेत. मात्र नववर्षाच्या स्वागतपार्ट्या होत असताना शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता नवी मुंबई पोलीस देखील सज्ज झाले आहेत. त्यासाठी ३० व ३१ डिसेंबर असे दोन दिवस शहरात कडेकोट बंदोबस्त लावला जाणार आहे. महत्त्वाच्या मार्गांवर शहर पोलीस व वाहतूक पोलीस यांच्यामार्फत नाकाबंदी देखील लावली जाणार आहे. त्यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला जाणार आहे. तर पार्ट्यांच्या ठिकाणी नशेसाठी अमली पदार्थांचा वापर केला जावू नये, याकरिता भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून पार्टीच्या ठिकाणांचा शोध घेवून त्याठिकाणच्या गैरप्रकारांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. याबरोबरच पोलीस ठाण्याअंतर्गत हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेवून पार्टीच्या आयोजनासंदर्भातल्या खबरदारीच्या आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. नववर्षाचे स्वागत होत असताना उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. अनेकदा मद्यपान केल्यानंतर काहींचे जुने वाद उफाळून येतात. यामुळे त्यांच्यात भांडण होवून हाणामारीची देखील शक्यता असते. असे झाल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो.
मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघात होवून गंभीर दुर्घटनाही घडू शकते, शिवाय पार्टीच्या ठिकाणी पुरवण्यासाठी शहराबाहेरून मद्याचा देखील पुरवठा होवू शकतो. असे प्रकार टाळण्यासाठी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची झाडाझडती घेतली जाणार आहे. शहरातील पामबीचवर वाहतूक पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्साहात, परंतु शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून नववर्षाचा आनंद साजरा करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केल्या आहेत. त्यानंतरही कोणी नियमाचे उल्लंघन केल्यास, त्याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
काही वर्षांपासून नवी मुंबई पोलिसांकडून थर्टी फर्स्टच्या निमित्ताने बंदोबस्तासोबतच नागरिकांमध्ये जनजागृतीचाही प्रयत्न होत आहे. त्यानुसार थर्टी फर्स्टच्या निमित्ताने वाशीतील शिवाजी चौकात दोन दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्याठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने नागरिकांना व्यसनमुक्त आनंद साजरा करण्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
पार्ट्यांमध्ये भेसळयुक्त दारूचा वापराची शक्यता
हॉटेलमध्ये रंगणाऱ्या पार्ट्यांमध्ये महसूलची नजर चुकवून छुप्या पध्दतीने दारू आणली जावू शकते. त्याशिवाय पार्ट्यांसाठी भेसळयुक्त दारूचाही वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांसह महसूल विभागाचे देखील हॉटेलमधील पार्ट्यांवर विशेष लक्ष राहणार आहे.
तळीरामांची होणार धरपकड
प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना पुढील दोन दिवस कसोटीचे ठरणार आहेत. मद्यपान करायचे असल्यास त्यांना सोबत चालक हा सक्तीने बाळगावाच लागणार आहे, अन्यथा ठिकठिकाणच्या नाकाबंदीत त्यांचा सामना पोलिसांशी झाल्यास कारवाई होणे निश्चितच आहे. पोलिसांची कोणी नजर चुकवू नये, याकरिता प्रत्येक महत्त्वाच्या व आडोशाच्या मार्गावर पुढील दोन दिवस पोलिसांची नाकाबंदी असणार आहे.
नववर्ष स्वागतासाठी रायगडवारी
1राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ,नवी मुंबईच्या वतीने सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता, तसेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड येथे रायगडवारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारी ३१ डिसेंबर रोजी दुर्गभ्रमंती आणि रविवारी पहाटे विशेष सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे.
2व्यसनांपासून दूर राहत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. याठिकाणी शिवसंत व शिवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यांतर्गत महाराजांच्या समाधी मंदिराचा अभिषेक, पाचाड येथील जिजाऊ आऊसाहेबांच्या समाधीचा अभिषेक पाहण्याची संधी मिळणार आहे.
रिसॉर्ट, फार्महाऊसवर वाद्ये वाजविण्यास मनाई
३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरात असलेले फार्महाऊस, रिसॉर्टमध्ये मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यावेळी मोठमोठ्या आवाजात वाद्ये वाजविली जातात. परंतु हा परिसर इकोझोन असल्याने कोणत्याही परिस्थितीत कर्कश वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत एकाही रिसॉर्ट, फार्महाऊसमधून वाद्ये वाजविण्याच्या परवानगीसाठी अर्ज केलेला नाही. तसेच कोणालाही डीजे, लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात येणार नाही. याबाबतच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय सर्व हॉटेल मालकांची बैठक घेऊन, अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, मद्यपान, महिला छेडछाड, वाढती गर्दी टाळण्याबाबत आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या, वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे निलेवाड यांनी सांगितले.