- प्राची सोनवणे, नवी मुंबईशहरात हिवताप, डेंग्यूने डोके वर काढले आहे. महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. या महिनाभरात डेंग्यूचे २६ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी २ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान ७३,९७७ रुग्णांचे रक्त तपासणीसाठी आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या तीन आठवड्यांमध्ये १४,०७० रुग्णांचे रक्त तपासणीसाठी आले आहे. जानेवारी ते जुलै दरम्यान हिवतापाचे ११६ तर गेल्या तीन आठवड्यांमध्ये हिवतापाचे ३२ रुग्ण आढळले.नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या रुग्णांच्या सर्वेक्षणामध्ये शहरातील करावे, घणसोली गावांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याचे निदर्शनास आले. महानगरपालिकेच्या वतीने २४ जुलैपासून ‘डास उत्पत्ती शोध मोहिम’ हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती शहर हिवताप अधिकारी डॉ. उज्ज्वला ओतुरकर यांनी दिली. मोहिमेअंतर्गत आठवडाभरात ४५, १६० घरांमध्ये डास उत्पत्तीच्या जागा शोधण्यात आल्या. त्यापैकी १९९ घरांमध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आहे. तेथील डासांच्या अळ््या, साचलेले पाणी नष्ट करण्यात आले आहे. रक्ताच्या चाचण्यांमध्ये एनएस-१ आढळल्यास घाबरून जायची गरज नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. रुग्ण संशोधन कारवाईअंतर्गत रुग्णांच्या घरी जाऊन डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. परिसरात पावडर फवारणी तसेच धुरीकरण केले जात आहे. रोगांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला जातो.- डॉ. उज्ज्वला ओतूरकर, शहर हिवताप अधिकारी
साथींचा ‘ताप’
By admin | Published: July 31, 2015 12:14 AM