उमेदवारी देताना पक्षांची कसरत
By Admin | Published: May 5, 2017 06:22 AM2017-05-05T06:22:18+5:302017-05-05T06:22:18+5:30
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रमुख पक्षात इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे पक्षाच्या जागा वाढण्याची शक्यता
मयूर तांबडे / पनवेल
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रमुख पक्षात इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे पक्षाच्या जागा वाढण्याची शक्यता असली तरी या आयारामांमुळे निष्ठावान दुखावले जाण्याची व ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. प्रामुख्याने शिवसेना, भाजपा व शेकाप आघाडीची डोकेदुखी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी देताना सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल शहरातील राजकीय वातावरण गेल्या महिनाभरात चांगलेच ढवळून निघाले आहे. तिकीट न मिळाल्यास अनेक इच्छुक पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत, तर काही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना सर्वच पक्षांनी सावधगिरी बाळगली आहे. शनिवार, ६ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी सर्वच पक्षांत उमेदवारांची झुंबड उडणार आहे. प्रशासनानेही खबरदारी म्हणून जादा कर्मचारी नियुक्त केले आहेत.
पनवेल महापालिकेत शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. काही प्रभागात एखाद्या पक्षाने ग्रामीण भागातील उमेदवार उभा केला असेल तर सर्वपक्षीय मतभेद बाजूला सारून गावातील उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चयदेखील केला जात आहे. शेकाप, भाजपा, शिवसेना, काँग्रेस या साऱ्याच पक्षांकडे सध्या इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांतील दरी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. साऱ्याच पक्षांनाउमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
काँग्रेसचे प्रभाग ९ मधून जमीर शेख, प्रभाग १९ मधून राकेश जाधव हे अपक्ष म्हणून अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीचे आनंद भंडारी प्रभाग १६ मधून अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. शेकापचे गणेश कडू यांना प्रभाग १७ मधून उमेदवारी मिळत नसल्याने ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपाचे गणेश पाटील यांना देखील प्रभाग १५ मधून उमेदवारी मिळत नसल्याने ते शेकापमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. एकंदरीतच साऱ्याच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.