गोल्फ कोर्समधील पार्टीच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 02:06 AM2019-01-03T02:06:27+5:302019-01-03T02:06:38+5:30
खारघरमधील गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात ३१ डिसेंबरला पार्टीचे आयोजन केले होते. याविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची सिडको प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
पनवेल : खारघरमधील गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात ३१ डिसेंबरला पार्टीचे आयोजन केले होते. याविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची सिडको प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांनी दक्षता विभागाला दिले आहेत.
सिडकोने खारघर सेक्टर २३, २४, २५ मध्ये तब्बल १०३ हेक्टर प्रकल्पावर १८ होल्सचा गोल्फ कोर्स तयार केला आहे. याच ठिकाणी ३१ डिसेंबरला पार्टीचे आयोजन करून ७५० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली होती. ‘लोकमत’ने याविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शेकापचे नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना पत्र लिहून, या पार्टीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्य दक्षता अधिकारी अशोक सिंगारे यांनी त्वरित चौकशीदेखील सुरू केली असून, लवकरच चौकशी पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.