निवडणूक शांततेत पार पाडा; दत्तात्रेय नवले यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:22 PM2019-09-23T23:22:19+5:302019-09-23T23:22:35+5:30
पनवेलमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक
पनवेल : आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी सोमवारी पनवेलमधील काळसेकर महाविद्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने विविध सूचना करण्यात आल्या.
या बैठकीला पोलीस, महसूल अधिकारी, पालिका अधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. २१ आॅक्टोबरला विधानसभेचे मतदान पार पडणार आहे. तर २४ आॅक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यादृष्टीने मतदान केंद्रांवर कोणती खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केल्या. तसेच प्रचाराच्या अनुषंगाने घ्यावयाची परवानगी याबाबत पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमधील बिघाडाची माहिती मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकाºयाला द्यावी असे सांगून ईव्हीएमबाबत विनाकारण अफवा पसरविणाºया घटकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा नवले यांनी दिला. या वेळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परवानगींचा ससेमिरा थांबविण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व प्रकारची परवानगी मिळावी याकरिता एक खिडकी योजना राबविण्याची विनंती केली.
पनवेल विधानसभा मतदारसंघ राज्यातील सर्वांत मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. या वेळी पोलिसांनीदेखील काही मुद्दे उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कळंबोलीत मतदान केंद्रांवर बीएलओंवर पक्षपातीपणाचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला होता. या वेळी मतदान केंद्रावर वाद निर्माण झाला होता, असे वाद निर्माण होणार नाहीत याकरिता बीएलओंना सूचना देण्याची विनंती करण्यात आली. कळंबोलीचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी बीएलओंना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले.
पनवेल मतदारसंघ माहिती
मतदार संख्या - ५ लाख ५४ हजार ४६४
पुरुष मतदार - २ लाख ९७ हजार २७२
स्त्री मतदार - २ लाख ९७ हजार २७२
एकूण मतदान केंद्रे - ५६७
तळमजल्यावरील केंद्रे - ५२०
पहिल्या मजल्यावरील केंद्रे - ५४
दुसºया मजल्यावरील केंद्रे - २
सर्वांत जास्त मतदार असलेली केंद्रे - १५७ खारघर (१७५२ मतदार ) रेडक्लिफ शाळा
सर्वांत कमी मतदार असलेली मतदार केंदे्र -खैरवाडी १६३ (३०५ मतदार)