बिपरजॉय चक्रीवादळ आणि खराब हवामानामुळे गेटवे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए, सागरी मार्गावरील प्रवासी लाँच बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 09:56 PM2023-06-09T21:56:34+5:302023-06-09T21:56:55+5:30
बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात हवामान खराब झाले आहे.
मधुकर ठाकूर
उरण : बिपरजॉय चक्रीवादळ आणि खराब हवामानामुळे खबरदारीचे उपाययोजना म्हणून गेटवे- एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए,व या सागरी मार्गावरील प्रवासी लाँच वाहतूक शुक्रवारी दुपारपासून बंद करण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात हवामान खराब झाले आहे.
यामुळे हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे.चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्याने समुद्र खवळलेला आहे.याआधीच शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत.त्यामुळे १ जुनपासुनच राज्यातील मासेमारी बंद आहे.त्यानंतर
बिपरजॉय चक्रीवादळ आणि खराब हवामानामुळे खबरदारीचे उपाययोजना म्हणून गेटवे- एलिफंटा आणि जेएनपीए या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारी (८) दुपारपासूनच प्रवासी वाहतूक बंद केली असल्याची माहिती मुंबई गेटवे जलवाहतूक संघटनेचे सेक्रेटरी मामु मुल्ला आणि घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.
तर मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारी तीन वाजेपासून बंद करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली.तर करंजा- रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याची माहिती करंजा बंदर निरीक्षक देवीदास जाधव यांनी दिली. दुपारपासुनच प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली.वातावरण निवळल्यानंतरच प्रवासी वाहतूकीस सागरी मार्गावरुन पुर्ववत सुरू करण्यात येईल अशी माहिती मोरा बंदर विभागाचे निरिक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली.