नवी मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकात प्रवासी तरुणाला लुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मात्र, या घटनेनंतर तक्रारदार तरुणालाच रेल्वे पोलिसांच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.नितीन माने असे तरुणाचे नाव आहे. एपीएमसी येथे व्यवसाय करणारा नितीन हा शनिवारी रात्री घरगुती वादातून घराबाहेर निघाला. रात्री उशिरा सानपाडा स्थानकात पोहोचला असता, लोकल बंद झाल्या होत्या. यामुळे स्थानकातच रात्र काढण्याच्या उद्देशाने तो फलाट क्रमांक चारच्या बाकड्यावर झोपला. या वेळी एका चोरट्याने त्याचा खिसा कापून पाकीट मारले. हा प्रकार निदर्शनास येताच नितीन याने त्याचा पाठलागही केला; परंतु रेल्वे रुळावरून अंधारात चोरटा पळाला. सानपाडा स्थानकात यापूर्वीही चालत्या रेल्वेतून लूटमारीचे गुन्हे घडलेले आहेत. त्या ठिकाणी सीसीटीव्ही असतानाही हे चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच संशय व्यक्त होत आहे. घटनेनंतर नितीनने सानपाडा रेल्वे पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, त्यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. तो वाशी रेल्वे पोलिसांकडे गेला असता, त्यांनीही नितीन याचीच उलट चौकशी केली. नितीनचा पासपोर्ट व काही महत्त्वाची कागदपत्रेही चोरट्याने पळवल्याचे तक्रार त्यांनी केली आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकात प्रवाशाला लुटले
By admin | Published: April 10, 2017 6:16 AM