नवी मुंबई : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू असलेल्या लोकलमधून आता महिलांनाही प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात रेल्वे स्थानकात ये-जा करण्याचे प्रवेश मार्ग बंद करण्यात आले होते. अद्यापही हे मार्ग बंद असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच महिला प्रवाशांना धोकादायक मार्गातून ये-जा करावी लागत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानकातील सर्व प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी केली जात आहे.
लॉकडाऊन काळात लोकल सेवा बंद असल्याने रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार बॅरिगेट्स लावून बंद ठेवण्यात आले होते. काही दिवसांनी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. यावेळी रेल्वे स्थानकातील सर्व प्रवेशद्वारे खुली केली नाहीत. काही ठरावीक ठिकाणांहून प्रवेश दिला जात होता.
काही दिवसांपूर्वी महिलांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे, परंतु अद्यापही सर्व प्रवेशद्वारे खुली केलेली नाहीत, त्यामुळे रेल्वे स्थानकातून ये-जा करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक महिला प्रवासी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या बॅरिगेट्समधून वाट काढत स्थानकात ये-जा करीत असून, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.