पनवेल-बेलापूर मार्गावरील ब्लॉकमुळे प्रवाशांना फटका; मुंबई-मंगळुरू गाडी १० तास खोळंबली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 05:37 AM2023-10-02T05:37:44+5:302023-10-02T05:37:56+5:30
सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने या आठवड्यात जोडून सुट्ट्या आल्या होत्या.
पनवेल : शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते बेलापूर वाहतूक ३८ तास बंद असल्याने या दरम्यान प्रवाशांना सार्वजनिक प्रवासी सेवेचा पर्याय वाहतुकीसाठी वापरावा लागला. या दरम्यान प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने या आठवड्यात जोडून सुट्ट्या आल्या होत्या. त्यामुळेच मेगा ब्लॉक घेऊन इन्फ्रास्ट्रक्चरची मोठी कामे पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात
आले होते.
सेंट्रल रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुण कुमार यांनी परिवहन मंत्रालयाला पत्र लिहून पनवेल ते बेलापूर रेल्वे मार्ग बंद असल्यामुळे बेलापूरपासून पुढे पनवेलपर्यंत ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन सेवा, बी.ई. एस. टी., एन. एम. एम. टी. अशा विविध परिवहन सेवांची अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याबाबत पत्र दिले होते.
डायरेक्ट फ्रीट कॉरिडोर, पनवेल-कर्जत उपनगरीय सेवा, फलाट क्रमांक आठ ते बाराची उभारणी अशी तीन महत्त्वाकांक्षी आणि पनवेल स्थानकाचे कायापालट करणारी कामे सध्या रेल्वे स्थानकामध्ये सुरू करण्यात आली. त्यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या मेगा ब्लॉकचा फटका बसला. दरम्यान, शनिवारी जेएसडब्ल्यू कंपनीची कॉइल घेऊन येणाऱ्या मालगाडीला पनवेल रेल्वे स्थानकात दुपारी तीन वाजता अपघात झाल्याने त्यात आणखी भर पडली. यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही स्थानकातच थांबून होत्या. हे मालगाडीचे डबे उचलण्यासाठी तीन पोकलेन मशीन, तीन जेसीबी मशीन व एक अवाढव्य अशा क्रेनच्या साहाय्याने ते हलवण्याचे काम चालू होते.
प्रवाशांना फटका
३८ तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक ठिकाणी खासगी वाहतूकदारांकडून लूट झाल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.
एनएमएमटीच्या २५० फेऱ्या
हार्बर मार्गावर पनवेल ते बेलापूर दरम्यान ३८ तासांचा मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) उपक्रमाने तुर्भे, आसुडगाव व घणसोली डेपोतील ३० बसेस पनवेल ते बेलापूर मार्गावर वळविल्या होत्या. या बसेसनी दिवसभर २५० पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण केल्या.
एनएमएमटी बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली. खारघर ते तळोजा मार्गावरील बसेसही पनवेल बेलापूर मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. सोमवारीही आवश्यकतेप्रमाणे जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेल्या बसेसना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी दिली आहे.
मुंबई-मंगळुरू गाडी १० तास खोळंबली
डोंबिवली : पनवेल-कळंबोली दरम्यान शनिवारी मालगाडी घसरल्याने कोकणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या सर्व गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे मुंबई-मंगळुरू या गाडीला शनिवारी स्थानकात थांबविण्यात आली होती. सुमारे दहा तास गाडी दिवा स्थानकात थांबल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. रात्रभर दिवा स्थानकात गाडीमध्ये काढल्यानंतर प्रवाशांनी रविवारी सकाळी मध्य रेल्वे प्रशासनाला जाब विचारायला सुरुवात केली असता दिवा स्थानकातील उपस्थित कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे प्रवाशांनी सुरुवातीला कोकण मार्गावर रेल्वे रुळावर उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली व त्यानंतर प्रवाशांनी आपला मोर्चा लोकल मार्गाकडे वळविला.
दिवा स्थानकात दहा तासांपेक्षा जास्त काळ खोळंबले असताना रेल्वे प्रशासनाने त्यांची विचारपूस करणे व सोय करण्यापेक्षा त्यांना चुकीची वागणूक दिल्यानंतर प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यानंतर प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मध्य रेल्वे प्रशासनाने अशा वेळेस प्रवाशांशी संवाद सुरू ठेवला पाहिजे. त्यांना होणाऱ्या गैरसोयी या दूर केल्या पाहिजेत. अन्यथा आज दिवा स्थानकात घडलेल्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती कुठल्याही स्थानकात होऊ शकते, असे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड्. आदेश भगत यांनी सांगितले.