एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:32 AM2018-06-09T02:32:31+5:302018-06-09T02:32:31+5:30

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेल्या फसव्या वेतनवाढीविरोधात शुक्र वारी अचानक काम बंद आंदोलन छेडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

 Passengers of ST passengers due to ST collisions; Passengers express dissatisfaction | एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी

एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल; प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी

googlenewsNext

पनवेल : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेल्या फसव्या वेतनवाढीविरोधात शुक्र वारी अचानक काम बंद आंदोलन छेडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. पनवेल एसटी आगारातील एकूण ८0 बसपैकी ७0 गाड्या डेपोमध्येच बंद ठेवण्यात आल्या होत्या. लांब पल्ल्याचा गाड्या सोडल्यास पनवेलवरून पेण, अलिबाग, डोंबिवली, कल्याण तसेच ग्रामीण भागात धावणाºया गाड्या यावेळी पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागले.
पनवेल एसटी आगारात एकूण ४२५ च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वाहक, चालक, मॅकेनिकल, क्लिनिकल स्टाफ, आगार व्यवस्थापक आदींचा समावेश आहे. ४२५ पैकी जवळजवळ ४00 कामगार या संपात सहभागी झाले होते. सकाळी अचानकपणे एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने नियमित प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यास मोठा अडथळा निर्माण झाला.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेली पगारवाढ ही फसवी असल्याच्या निषेधार्थ कामगारांनी हा बंद पुकारला. पनवेल बस आगारातून शिर्डी, अहमदनगर, फलटण, धुळे, सातारा या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्यास इतर ठिकाणी जाणाºया सर्व गाड्या बंद होत्या. यामध्ये विशेषत: पनवेल ग्रामीण, पाताळगंगा, तळोजा औद्योगिक वसाहत याठिकाणी जाणाºया कामगारवर्गाची मोठे हाल झाले. मुंबई,ठाणे, दादरकडे जाणाºया प्रवाशांचे देखील मोठे हाल झाले. नाईलाजास्तव प्रवाशांना खासगी बसेस, रिक्षा, ओला, उबेर यासारख्या खासगी प्रवासी वाहतुकीचा उपयोग करावा लागला. एसटी कामगारांच्या संपाचा फायदा खासगी वाहतूकदारांना झाल्याचे यावेळी दिसून आले.
प्रवाशांची गैरसोय व्हावी असा आमचा कोणताच उद्देश नव्हता. मात्र तुटपुंज्या पगारावर आमचे घर कसे काय चालणार ? या पगारवाढीत एसटी महामंडळात १0 वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या कामगारांना केवळ २000 ते २२00 रु पये वाढणार आहेत.
नव्याने कार्यरत असलेल्या कामगारांना ही पगारवाढ केवळ ८00 रु पयापर्यंत असल्याने हे अन्यायकारक असल्याने आम्ही बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला असल्याचे पनवेल बस आगाराचे सचिव आर. डी. गाडे यांनी सांगितले. शिवसेनेच्या कामगार संघटनेशी संलग्न असलेले कामगार या संपात सहभागी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी वाहतूकदारांच्या
व्यवसायात दुपटीने वाढ
एसटी कामगारांनी पुकारलेल्या अघोषित संपाचा फायदा खासगी वाहतूकदारांना झाला. यामध्ये खासगी बसेस, रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर आदींचा समावेश आहे. वेळेवर कामावर किंवा नियोजित ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला. यामुळे खासगी वाहतूकदारांच्या व्यवसायात दुपटीने वाढ झाल्याचे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून सांगण्यात आले.

खासगीकरणाकडे वाटचाल ?
सर्वसामान्यांच्या विश्वासाची प्रवासी सेवा म्हणजे एसटीकडे पाहिले जाते. मात्र सध्याच्या घडीला परिवहन मंत्री हे एसटीची वाटचाल खासगीकरणाकडे करीत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव विजय कोळी यांनी केला. एसटी कर्मचारी आयोग कृती समितीच्या संलग्न असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटक, ममको, कनिष्ठ वेतन श्रेणी, संघर्ष ग्रुप व विदर्भ एसटी कामगार संघटना आदींशी जोडलेले आहेत. मात्र प्रत्येक बाबी सध्याच्या एसटीमध्ये खासगीकरण सुरु आहे. याचा फटका प्रवाशांना दीर्घकाळासाठी बसणार असल्याचे कोळी यांनी सांगितले. प्रवासी आमचे दैवत आहेत त्यांना त्रास देणे आमचा उद्देश नाही. मात्र शासन आमचा अंत पाहत असल्याने आम्हाला या प्रकारची भूमिका घ्यावी लागत असल्याचे कोळी यांनी सांगितले.

Web Title:  Passengers of ST passengers due to ST collisions; Passengers express dissatisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.