प्रवाशाने काढली प्रशासनाची लक्तरे; घाणीतच ठिय्या मांडून आंदोलन
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 3, 2023 04:09 PM2023-08-03T16:09:28+5:302023-08-03T16:10:33+5:30
रस्त्यावरील अस्वचतेची तक्रार करूनही दुर्लक्ष, प्रशासनाने तिथले घाणीचे ढिगारे न हटवल्यास शुक्रवारी स्वखर्चाने आपण ते हटवू असा इशारा देऊन प्रशासनाची लक्तरे काढली
नवी मुंबई : बस थांब्याच्या समोरच रस्त्यावर साचलेल्या घाणीमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने प्रवास्याने चक्क घाणीतच बसून आंदोलन पुकारले. सायन पनवेल मार्गावरील वाशी येथील बस थांब्यावर गुरुवारी दुपारी संतप्त प्रवास्याने हा प्रकार केला. त्याठिकाणी साचलेल्या घाणीमुळे प्रवास्यांना होत असलेल्या त्रासातून सुटकेसाठी त्यांनी हे आंदोलन केले.
नवी मुंबईत स्वच्छता अभियान राबवले जात असले तरीही अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यात सायन पनवेल मार्गाचाही समावेश आहे. अशाच प्रकारातून सायन पनवेल मार्गावर वाशी येथील एसटीच्या थांब्यासमोरच मोठ्या प्रमाणात घाण साचली होती. यामुळे वाशी येथून बसने प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना या घाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यात डासांची पैदास होऊन आरोग्याला देखील धोका निर्माण होत आहे.
तीन दिवसांपूर्वी घणसोली येथील रहिवाशी जयवंत निकम हे सातारा येथे जाण्यासाठी बस थांब्यावर आले असता त्यांना तिथल्या घाणीचा त्रास झाला. यामुळे त्यांनी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयात तक्रार केली असता त्यांनी तिथला गाळ एकत्र करून रस्त्यावरच त्याचा ढिगारे लावले. तर घाणीचे हे ढिगारे उचलण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे गुरुवारी निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता त्यांना रस्त्यावरील घाण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही प्रशासनाकडून स्वच्छतेच्या कामात होत असलेल्या टोलवाटोलवीला कंटाळून निकम यांनी अखेर घाणीच्या ढिगाऱ्यावरच बसून दोन्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच संपूर्ण दिवसभर ढिगाऱ्यावर बसून त्यांनी आंदोलन केले. यानंतर देखील प्रशासनाने तिथले घाणीचे ढिगारे न हटवल्यास शुक्रवारी स्वखर्चाने आपण ते हटवू असा इशारा देऊन प्रशासनाची लक्तरे काढली.