रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे प्रवासी वेठीस; वाशी खाडीपुलावर रोज चक्का जाम

By नामदेव मोरे | Published: December 14, 2022 08:57 AM2022-12-14T08:57:52+5:302022-12-14T08:57:59+5:30

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो.

Passengers stranded due to blocked flyovers; Chakka Jam on Vashi Khadi bridge every day | रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे प्रवासी वेठीस; वाशी खाडीपुलावर रोज चक्का जाम

रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे प्रवासी वेठीस; वाशी खाडीपुलावर रोज चक्का जाम

Next

- नामदेव मोरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपूल व तुर्भे पुलाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, प्रतिदिन एक लाख वाहतूकदारांना याचा फटका बसत आहे. वाशी टोलनाका परिसरात नियमित चक्का जाम होत आहे. तुर्भेमध्ये वाहतूक बदलाचे सूचना फलकच नसल्यामुळे वाहतूकदारांना ठाणे-बेलापूर रोडवर पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशालाही कात्री लागत असून, उड्डाणपुलांचे काम कधी पूर्ण होणार?, असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो. या मार्गावरून प्रतिदिन ८० हजार ते १ लाख वाहनांची ये-जा सुरू असते. या रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शासनाने वाशी खाडीपुलावर ऑक्टोबर २०२० पासून तिसरा पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. जवळपास ७७५ कोटी रुपये खर्च करून १२.७० मीटर रुंद व १८३७ मीटर लांबीच्या या पुलाचे काम नाेव्हेंबर २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध कारणांमुळे हे काम रखडले असून, ते पूर्ण होण्यास २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाशी गाव ते टोल नाका व नवी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर टोल नाका ते खाडीपुलाच्या मध्यापर्यंत रोज वाहतूककोंडी होत आहे. जवळपास ८५० मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तीन मिनिटांऐवजी १५ ते ३० मिनिटे वेळ घालवावा लागत आहे.

वाशी खाडीपुलाप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे पुलाच्या विस्तारीकरणाचे कामही रखडले आहे. २०१९ मध्ये या पुलाचे काम सुरू केले आहे. जुलै २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप रेल्वे मार्गिकेवरील गर्डर टाकायचे काम सुरू आहे. या पुलावरून ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे नाक्याकडे जाणारी मार्गिका तोडण्यात आली आहे. याविषयी योग्य सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेक वाहतूकदारांना शिरवणे व नेरूळवरून वळसा घालून यावे लागत आहे. सानपाडावरून रिक्षाने व टॅक्सीने एमआयडीसीकडे जाणाऱ्या नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

Web Title: Passengers stranded due to blocked flyovers; Chakka Jam on Vashi Khadi bridge every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.