फेरीवाल्यांच्या घुसखोरीने प्रवासी त्रस्त

By admin | Published: November 8, 2016 02:50 AM2016-11-08T02:50:21+5:302016-11-08T02:50:21+5:30

हार्बर तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलमधील भिकारी, फेरीवाले आणि तृतीयपंथीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Passengers stranded by hawkers intruded | फेरीवाल्यांच्या घुसखोरीने प्रवासी त्रस्त

फेरीवाल्यांच्या घुसखोरीने प्रवासी त्रस्त

Next

नवी मुंबई : हार्बर तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलमधील भिकारी, फेरीवाले आणि तृतीयपंथीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे पोलिसांकडून कडक कारवाई केली जात नसल्याने फेरीवाले बिनधास्तपणे वावरताना पहायला मिळतात. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीच्या वेळेतही फेरीवाल्यांना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार प्रवासी संघाकडून केली जात आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-ठाणे आणि हार्बर मार्गावरील वाशी-पनवेल या मार्गावरील लोकलमध्ये फेरीवाले, विक्रेते, भिकारी आणि तृतीयपंथीयांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वच रेल्वेस्थानकांवर होमगार्ड व रेल्वे पोलीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तैनात असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात या मार्गावर पोलीस व होमगार्ड यांची कमतरता भासते. रात्रीच्या वेळी देखील प्रवाशांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे. लोकलमधील भिकाऱ्यांमध्ये महिला तसेच बालक यांचे प्रमाण जास्त आहेत. ही लहान मुले जबरदस्तीने प्रवाशांकडून पैशांची मागणी करत असल्याचे चित्र पहायला मिळते.
कॅन्सरग्रस्त मुलांना मदत म्हणून प्रवाशांना फसवून मदत निधी गोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यालयीन वेळेतही फेरीवाले प्रवाशांना ढकलून, शिवीगाळ करुन हक्क गाजवित असल्याचे प्रकार पहायला मिळतात. प्रवाशांनी पैसै देण्यास नकार देताच तृतीयपंथीयांकडून शिवीगाळ करून शिव्याशाप देतात. पोलिसांचा धाक दाखविला तर प्रवाशांशी वाद घालत फेरीवाल्यांकडून मनमानी केली जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. महिला प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असून पुरुष फेरीवाल्यांकडून छेडछाड होत असल्याचे प्रवासी विनिता शिंदे यांनी सांगितले.
महिला सुरक्षेसाठी होमगार्ड, पोलीस, आरपीएफ यांची नियुक्ती करुन किमान महिला डब्यासमोरील सुरक्षेकडे लक्ष दिले जावे. फेरीवाल्यांच्या घुसखोरीवर वेळीच लगाम घातला तर प्रवाशांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येऊ शकतो, असे मत नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Passengers stranded by hawkers intruded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.