पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या उरण, द्रोणगिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार रेल्वे स्थानकांत पिण्याच्या पाण्यावाचून प्रवाशांची तडफड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 02:00 AM2024-05-03T02:00:04+5:302024-05-03T02:00:45+5:30

मध्य रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Passengers struggle for drinking water at Uran, Drongiri, Nhava-Sheva, Shemtikhar railway stations inaugurated by the Prime Minister | पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या उरण, द्रोणगिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार रेल्वे स्थानकांत पिण्याच्या पाण्यावाचून प्रवाशांची तडफड

पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या उरण, द्रोणगिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार रेल्वे स्थानकांत पिण्याच्या पाण्यावाचून प्रवाशांची तडफड

मधुकर ठाकूर -

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या उरण -नेरूळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणगिरी, न्हावा -शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेली नाही.यामुळे ऐन उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या हजारो गरीब- गरजु प्रवाशांवर पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहाण्याची पाळी आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासी वाहतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जानेवारी  २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.उरण-नेरुळ मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यापासून मागील चार महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत चालली आहे.उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणगिरी, न्हावा -शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या ,मोठमोठे कुलर,नळ जोडण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र अद्यापही चारही स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याची पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

आधीच उरणचा उष्म्याचा पाराने ४२ डिग्री पर्यंत चढल्याने प्रवासी पुरते घामाघूम होऊन लागले आहेत.मात्र उरण, द्रोणगिरी, न्हावा शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने गरीब- गरजु प्रवाशांवर पाण्यावाचून घसा कोरडा पडू लागला आहे.तसेच या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अद्यापही शौचालयाची सोयही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यामुळे सध्या प्रवाशांची पाणी आणि शौचालयाच्या अभावामुळे मोठी गैरसोय होऊ लागली आहे.

 चारही स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने सध्या फक्त कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करण्याची मुभा कर्मचारी काही वेळा प्रवाशांना इमरजन्सी परिस्थितीत करण्यासाठी देतात.मात्र आता  चारही स्थानकांवरील साफसफाईच्या कामाच्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली आहे.ठेकेदाराला साफसफाईच्या कामाची मुदत अद्यापही वाढवून देण्यात आली नसल्याने मागील दोन दिवसांपासून ठेकेदारांनी साफसफाईची कामे बंद केली आहेत.परिणामी स्थानक परिसर व सध्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयात साफसफाई अभावी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याच्या संतप्त  प्रतिक्रिया रेल्वे कामगारांकडूनच व्यक्त करण्यात येत आहेत.

 उरण-नेरुळ मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यापासून मागील चार महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत चालली आहे.यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.तसेच अद्यापही या चारही स्थानकांवर अद्यापही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही सोय करण्यात आलेली नाही.यामुळे गैरकृत्यांना ऊत आला आहे.मध्यरेल्वे प्रशासनाच्या सुरू असलेल्या अशा या ढिसाळ कारभारामुळे प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या गैरसोयींबाबत अधिक माहिती घेऊन कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला कळवितो असे मध्यरेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी एस.के.जैन यांनी सांगितले.
 

Web Title: Passengers struggle for drinking water at Uran, Drongiri, Nhava-Sheva, Shemtikhar railway stations inaugurated by the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.