नवी मुंबई : लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना टॅक्सीत घेऊन लुटल्याने दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे इतर साथीदार मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनाही चौकशीसाठी तुर्भे एमआयडीसी पोलीस ताब्यात घेणार आहेत. त्यांनी ठाणे-बेलापूर मार्गावर रात्रीच्या वेळी दोघा प्रवाशांना गंभीर मारहाण करून लुटल्याच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.मध्यरात्रीच्या वेळी टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटल्याच्या दोन घटना १० ते १५ एप्रिल दरम्यान घडल्या होत्या. या दोन्ही घटनांमध्ये एकट्या प्रवाशाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने टॅक्सीत घेऊन मारहाण करून लुटण्यात आले होते. ऐरोली येथे राहणारे प्रसाद कोल्हे (३५) हे चुलत भाऊ नीलेश कोल्हे यांच्यासह औरंगाबाद येथील गावावरून आले असता, पहाटे ४ वाजता सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे उतरले होते. या वेळी ते ऐरोलीला जाण्यासाठी टॅक्सीत बसले असता कोपरखैरणे स्थानकालगत टॅक्सीत अगोदरच बसलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूने वार करून लुटले होते. यानंतर दिघा येथील रहिवासी ओंकार साळवी (३२) हे मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास सीबीडी येथून टॅक्सीने ऐरोलीकडे येत होते. या वेळीही टॅक्सीमध्ये अगोदरच चालकासह चौघे बसलेले होते. त्यांनी साळवी यांच्या डोक्यात जड वस्तू मारून त्यांच्याकडील ऐवज लुटला होता. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उल्हास कदम यांचे पथक तपास करत होते. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी लुटमारी करणाऱ्या एका टोळीला अटक केल्याची माहिती त्यांना मिळाली. चौकशीत त्यांनीच नवी मुंबईतही गुन्हे केलेले असल्याचे सांगून अधिक तपासाकरिता तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दोघांचा ताबा घेतला आहे. सलमान अब्दुल रहिम खान (२२) व महम्मद नुर अलम गुमाल रसुल खान (२०) अशी त्यांची नावे आहेत. तर त्यांचे तीन साथीदार अद्यापही मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनाही तुर्भे एमआयडीसी पोलीस चौकशीकरिता ताब्यात घेणार आहेत. (प्रतिनिधी)
प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक
By admin | Published: May 01, 2017 6:50 AM