नवी मुंबई/कळंबोली : पाच दिवसांच्या बाप्पाला शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. नवी मुंबई शहरासह पनवेल परिसरातील रोडपाली, आदई आणि खांदेश्वर तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी सिडकोच्या वतीने विसर्जनाकरिता सुविधा करण्यात आली होती.
सोमवारी सर्वत्र गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले. दोन दिवस पावसाने धुवाधार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचा फटका काही गणेशोत्सव मंडळांना बसला. मंगळवारी प्रभाग ‘ब’ मध्ये जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी पाच दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी जड अंतकरणाने निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असे म्हणत गणरायाची वाजत-गाजत मिरवणूक काढली होती. रोडपाली तलाव परिसरात सिडकोच्या वतीने मंडप बांधण्यात आला आहे. त्याचबरोबर येथे गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सुविधा करण्यात आली होती. शुक्रवारी ७ वाजेपर्यंत रोडपाली, आदई आणि खांदेश्वर तलावात एकूण ८४ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी कळंबोली आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यातून बंदोबस्त तैनात केला होता.