महामार्गावरील खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉकचा उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:43 AM2018-08-23T01:43:34+5:302018-08-23T01:43:51+5:30
दुरुस्तीचे काम सुरू; प्रवाशांमधील असंतोष दूर करण्याचा प्रयत्न
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजनांची चाचणी केली जात आहे. मोठे खड्डे असलेल्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरूळ, खारघर, कळंबोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले आहेत. खड्डे बुजविले की पावसामुळे काही दिवसांमध्ये पुन्हा खड्डे जैसे थे होत आहेत. दोन महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात अडथळे होऊ लागले आहेत. प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागल्यामुळे अखेर प्रशासनाने खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी, सानपाडा उड्डाणपूल व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे.
पेव्हर ब्लॉकमुळे मोठ्या खड्ड्यांचा प्रश्न मिटेल असे बोलले जात आहे. दोन दिवसांपासून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले.
खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या जैसे थे आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असून वाहतूककोंडीची समस्या कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.