उरण : आठवडाभरापासून कोसळणारा मुसळधार पाऊस, विविध प्रकल्पांतर्गत सुरू असलेली रस्ते-पुलांची कामे, अवजड वाहनांची वाढती रहदारी यामुळे उरण-पनवेल या महत्त्वाच्या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. उरण तालुक्यातून जाणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून विसर्जन स्थळी जाणारे मार्गही खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांवर सातत्याने वाहतूककोंडी होत आहे.
उरण-पनवेल मार्गावरील चारफाटा, नवीन शेवा, बोकडविरा पोलीस चौकी, नवघर फाटा, करळ ब्रीज, करळ फाटा, दास्तान फाटा, जासई शंकर मंदिर, शिर्के थांबा, गव्हाण फाटा-चिरनेर,जेएनपीटी परिसरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते, तर दुचाकीस्वारांचे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहेत. यंदा याच खड्ड्यांतून गणरायांचे आगमन झाले आहे. तसेच विसर्जनाचा मार्गही खड्डेमय असल्याने भक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. उरण-पनवेल या रस्त्यावर आजवर आठशेहून अधिक व्यक्तींना अपघातात जीव गमवावा लागला असून अनेकांना अपंगत्व आले आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. खड्ड्यांमुळे चालकांना आरोग्याच्या व्याधी बळावल्या असून मणका, पाठदुखी, कंबरदुखी, हाडाचे विकार उद्भवू लागले आहेत. परिसरात अनेक कंपन्यांची गोदामे असल्याने अवजड वाहनांचीही सतत वर्दळ असते. यामुळे
वाहतूककोंडीत आणखीन भर पडत आहे. वाहने २ ते ३ तास कोंडीत अडकून पडत असल्याने चालक हैराण झाले आहेत. नोकरदार वर्ग, विद्यार्थी तसेच कामगारांनाही इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांनाही या मार्गावरुन प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे, धोकादायक झाले आहे. एखाद्या उरणमधील रुग्णाला तातडीच्या उपचारासाठी वाशी, बेलापूर, पनवेल आदी परिसरात रुग्णालयात नेतानाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दररोजच्या खड्ड्यातील जीवघेण्या प्रवासामुळे उरणमधील नागरिक मेटाकुटीस येत आहेत. हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी तसेच चालकांकडून करण्यात येत आहे.