रविवारसह सार्वजनिक सुट्टी उमेदवारांच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:09 AM2019-04-11T00:09:37+5:302019-04-11T00:09:39+5:30
प्रचाराला गती येणार : प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी; कार्यकर्त्यांना घरोघरी जाण्याच्या सूचना
नवी मुंबई : नोकरी, व्यवसायामध्ये व्यस्त असलेल्या पनवेल, नवी मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागत आहे. प्रचाराला १७ दिवस शिल्लक असले तरी सण व उत्सवाच्या तीन सुट्या व दोन रविवार या पाच दिवसांमध्येच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यावर भर दिला जाणार असून कार्यकर्त्यांनाही घरोघरी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ठाणे व मावळ मतदार संघामधील प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून प्रचाराला गती दिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व आघाडीसह युतीच्या नेत्यांनी रॅली व सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये सकाळी व सायंकाळी उमेदवार रॅली काढून नागरिकांच्या भेटीला जात आहेत; परंतु नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत घराबाहेर असतात. यामुळे रॅली व सभांना नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. रॅलीसह सभांमध्ये कार्यकर्त्यांचाच भरणा सर्वाधिक असतो. यामुळे प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधता यावा यासाठी सुट्टीच्या दिवशी जास्तीत जास्त प्रचार करण्यावर भर देण्यात येणार आहे. शनिवारी श्रीराम नवमी असल्यामुळे शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बेलापूरमध्ये यादिवशी यात्रेचे आयोजन केले जाते. तुर्भेसह विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
प्रचारामध्ये पुढील दोन रविवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. दोन्ही महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंती आहे. १९ तारखेला हनुमान जयंती व गुड फ्रायडे आहे. सण उत्सव व रविवार मिळून पाच सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे या कालावधीमध्ये प्रचाराला गती देण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून नियोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये रॅलीचे आयोजन करावे. उमेदवारांची माहिती देणारी पत्रके प्रत्येक घरोघरी जाऊन वितरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागनिहाय रॅलींचेही या कालावधीमध्ये आयोजन केले जाणार आहे.
श्रीराम नवमी उत्सव
नवी मुंबईमध्ये श्रीराम नवमीला बेलापूर गावची यात्रा असते. ठाणे व रायगड परिसरामधील हजारो भाविक यात्रेला उपस्थित रहात असतात. याशिवाय तुर्भे गावामध्ये रामतनू माता मंदिरामध्येही उत्सवाचे आयोजन केले जाते. पनवेलमध्येही अनेक मंदिरांमध्ये महापूजा, पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याशिवाय विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले असून प्रत्येक ठिकाणी उमेदवारांनी स्वत: पोहचण्यासाठीचे नियोजन केले आहे.
जयंतीनिमित्त कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवी मुंबईसह पनवेलमधील प्रत्येक नोडमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रविवार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचणे शक्य होणार आहे. कार्यक्रमांना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वाढणार आहे.
हनुमान जयंती
१९ तारखेला हनुमान जयंती असून यादिवशी तुुर्भे नाक्यासह विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुर्भे परिसरामध्ये नवी मुंबई व बाहेरूनही भाविक उपस्थित रहात असतात. शहरात इतर ठिकाणीही कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, सार्वजनीक सुटी असल्यामुळे यादिवशी प्रचाराला गती येणार आहे.
पाच दिवस महत्त्वाचे
सर्वच पक्षाच्या नेत्यांना प्रचारासाठी १७ दिवस असले तरी दोन रविवार व सण उत्सवाच्या तीन सुट्या हे पाच दिवस महत्त्वाचे आहेत. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांची भेट घ्यावी. उमेदवारांची माहितीपत्रके बंद दरवाजामध्ये टाकण्याऐवजी प्रत्यक्ष नागरिकांची भेट घेऊन त्यांना देण्याची सूचना करण्यात आली आहे.