इंदिरानगरमध्ये पथ‘दिव्यांखाली’ अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:17 AM2017-08-28T04:17:22+5:302017-08-28T04:19:18+5:30
तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे
नवी मुंबई : तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. पथदिवे बंद असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गुन्हेगारी घटना घडत आहेत.
पालिकेच्या विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे तुर्भेत ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-महापे मार्गावर, तसेच इंदिरानगर ते बगाडे कंपनी दरम्यान पादचाºयांना ही समस्या भेडसावत आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झालेला असून, काही ठिकाणचे दिवेच नादुरुस्त स्थितीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातले हे महत्त्वाचे मार्ग असल्यामुळे दिवस-रात्र त्यावर रहदारी सुरू असते. शिवाय, अनेक चाकरमानी पायी या मार्गाचा वापर करत असतात; परंतु पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांची गैरसोय होत आहे. अंधाराचा आधार घेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती पादचाºयांना लुटत आहेत. तर भरधाव वाहनांकडून पादचाºयांना धडक लागून अपघाताचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सदर मार्गावरील पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी पालिकेच्या विद्युत विभागाला दिले असून, दिव्याखालचा अंधार दूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या नाकर्तेपणामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये सुधार घडत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे कोठीवाले यांचे म्हणणे आहे.