नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या रुग्णाला सोमवारी १0 आॅगस्ट रोजी रात्री छातीत वेदना होत असल्याने उपचारासाठी वाशीतील फोर्टिस रुग्णालयात आणले होते. परंतु बेड शिल्लक नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच रुग्णाचा मृत्यू झाला.रुग्णालयाकडून वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी रुग्णालयाने वाशी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांकडून बेड शिल्लक नसल्याचे सांगून उपचार करण्यासाठी नकार देण्यात येत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून केला जात आहे.सोमवारी रात्री घणसोली सेक्टर ७ येथे राहणाºया सुरेश चव्हाण (४८) यांना छातीत वेदना होऊ लागल्या. उपचारासाठी नातेवाइकांनी त्यांना वाशीतील फोर्टिस रुग्णालयात आणले. परंतु रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याचा आरोप चव्हाण यांच्या नातेवाइकांनी केला आहे. फोर्टिस रुग्णालयाने गंभीर असलेल्या रुग्णाला जागा नसल्याचे सांगत परत पाठवले. वेळेवर उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया रुग्णाचे नातेवाईक राजू जाधव यांनी दिली.आपत्कालीन कक्षात आणण्यात आलेल्या रुग्णाची तपासणी सुरू असताना त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात भरतीची चौकशी केली असता त्यांना आयसीयू बेड उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्ण कोसळला. सीपीआरच्या माध्यमातून तत्काळ जीवन बचाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु त्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्ण गमावल्याने रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.- डॉ. तृप्ती राठोड, मुख्य आरोग्य अधिकारी, हिरानंदानी रुग्णालय
वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू; फोर्टिस हॉस्पिटलमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 5:40 AM