n सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनामुळे यंदा प्रथमच अनेकांना कुटुंबापासून दूर दिवाळी साजरी करावी लागली. त्यात बाधित रुग्णांसह त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. वाशीतील कोविड सेंटरमध्ये या सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी केली.शहरवासीयांनी पुरेपूर खबरदारी घेत यंदाची दिवाळी साजरी केली. मात्र शहरातील सुमारे १२० जणांना यंदाची दिवाळी कुटुंबापासून लांबच साजरी करावी लागली. ऐन दिवाळीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिकेच्या वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्र येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे यंदा ना ओवाळणी झाली, ना अभ्यंग स्नान, ना सहकुटुंब फराळाचा आनंद घेता आला. मात्र जरी कुटुंबापासून दूर असले तरीही त्यांनाही दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न पालिकेतर्फे झाला. याकरिता वाशीतील कोविड सेंटरमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करून रांगोळी काढण्यात आली होती. या वेळी उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांच्यातले नैराश्य दूर केले. तर काहींनी फोनवर, व्हिडीओ कॉलवर बोलून आपली दिवाळी सहकुटुंब साजरी केली.
दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला होणारी ओवाळणी पहिल्यांदाच चुकली असल्याची भावना उपचार घेत असलेल्या व्यक्तीने व्यक्त केली. यादरम्यान कुटुंबाची आठवण येत असल्याने फोनवर बोलून तो क्षण आनंदात साजरा केला. मात्र कुटुंबाला प्रत्यक्ष भेटता न आल्याची खंत होती.
कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांना एकटेपणा वाटू नये या भावनेतून डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यासाठी केंद्रात रोषणाई करून घरच्यासारखी वातावरणनिर्मिती केली होती. डॉ. वसंत माने, वैद्यकीय अधिकारी.