लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईतील रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवार बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जात असून, प्रवेशद्वाराजवळील पदपथांवर दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ये-जा करणाऱ्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या दुतर्फ़ा बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जातात, तसेच प्रवेशद्वारासमोर असलेले रिक्षा स्टॅन्डमुळे या भागात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. प्रवेशद्वाराच्या शेजारील पदपथांवर दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावासमोरील रस्त्याच्या दुतर्फाही मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केली जातात, तसेच पदपथांवर दुचाकीही पार्किंग केल्या जात असल्याने, विविध उपचारांसाठी रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांना घेऊन येणारी वाहने, तसेच रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण होत असून, महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नो पार्किंग क्षेत्र शहरातील सर्वच रुग्णालय प्रवेशद्वारे परिसरातील रस्ते नो पार्किंग क्षेत्र घोषित केली आहेत. सदर परिसरात नो पार्किंगचे फलकही बसविण्यात आले आहेत, परंतु कोणत्याही रुग्णालय परिसरात नियमाचे पालन केले जात नसून, बेकायदेशीररीत्या वाहने पार्किंग केली जात आहेत