वलपमध्ये पाटील दाम्पत्य बनले सदस्य, पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा विजय ठरला चर्चेचा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:43 AM2021-01-19T09:43:21+5:302021-01-19T09:43:29+5:30
तालुक्यात २४ ग्रामपंचायतींपैकी खानावले आणि आकुर्ली ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या.
वैभव गायकर -
पनवेल : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वलप ग्रामपंचायतीमध्ये पाटील दाम्पत्य निवडून आले आहे. एकाच ग्रामपंचायतीमध्ये नवरा-बायको यापुढे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत. भोलेनाथ पाटील व जयमाला पाटील हे दोघे दाम्पत्य वलप ग्रामपंचायतीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोघांनी विजय संपादित केल्याने तालुक्यातील हा विजय चर्चेचा ठरला आहे.
तालुक्यात २४ ग्रामपंचायतींपैकी खानावले आणि आकुर्ली ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. या निवडणुकीत वलप ग्रामपंचायत चर्चेत होती. त्या ठिकाणच्या ९ जागांसाठी पाटील आणि खुटारकर असे दोन दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी भोलेनाथ पाटील व जयमाला पाटील हे दाम्पत्य निवडून आले आहे. तर खुटारकर दाम्पत्यात नवनाथ खुटारकर हे विजयी झाले असून संचिता खुटारकर या पराभूत झाल्या आहेत. या लढतीत दोन्ही दाम्पत्यांची थेट लढत नव्हती, मात्र एकाच ग्रामपंचायतीत दोन दाम्पत्य निवडणूक लढत असल्याने हा विषय चर्चेचा ठरला.
मतदारांनी आम्हाला दिलेल्या कौलाबद्दल आम्ही निश्चितच आनंदी आहोत. ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पती, पत्नी प्रयत्नशील राहू. मतदारांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मतदारांचे आभार व्यक्त करतो.
- भोलेनाथ पाटील, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, वलप ग्रामपंचायत