अलिबाग : जिल्हा नियोजन समितीवर शेकापचे आस्वाद पाटील आणि शिवसेनेचे तुकाराम कडू हे बिनविरोध निवडून आले आहेत. शेकापचे सुभाष पाटील, शिवसेनेचे मनोहर भोईर हे जिल्हा परिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे त्यांचे जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वही रद्द झाले होते. तेथील दोन जागांसाठी २८ डिसेंबरला निवडणूक पार पडली होती.जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती काम करते. विधानसभा, विधान परिषद आणि खासदारांच्या निधीचे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या वाट्याला येणाऱ्या निधीचे नियोजन समितीद्वारे केले जाते. कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये. यासाठी जिल्हा नियोजन समितीवर एकूण ३२ सदस्य काम करतात. ग्रामीण भागातून २४ आणि शहरी भागातून आठ सदस्य जिल्हा नियोजन मंडळावर निवडून द्यावयाचे असतात. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या ६२ सदस्यांमधून २४ सदस्य आणि शहरी भागातील नगर पालिका क्षेत्रातून आठ असे एकूण ३२ सदस्य निवडून द्यावयाचे असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतात. या निवडणुकीसाठी शेकापचे जिल्हा परिषद सदस्य आस्वाद पाटील आणि प्रियदर्शनी पाटील तर शिवसेनेचे तुकाराम कडू आणि नीलेश ताठरे यांनी अर्ज दाखल केले होते. प्रियदर्शनी पाटील आणि नीलेश ताठरे यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आस्वाद पाटील आणि तुकाराम कडू यांची जिल्हा नियोजन समितीवर बिनविरोध निवड झाल्याचे अपर जिल्हाधिकारी पोपटदाद मलीकनेर यांनी जाहीर केले.(प्रतिनिधी)
जिल्हा नियोजन समितीवर शेकापचे आस्वाद पाटील
By admin | Published: January 08, 2016 2:12 AM