सेनेच्या प्रचाराची धुरा पाटील यांच्या खांद्यावर
By Admin | Published: January 13, 2017 06:08 AM2017-01-13T06:08:24+5:302017-01-13T06:08:24+5:30
मागील काही वर्षांपासून शिवसेनेत असूनही प्रकृती ठीक नसल्याने पक्ष कार्यात सक्रिय सहभाग
पाली : मागील काही वर्षांपासून शिवसेनेत असूनही प्रकृती ठीक नसल्याने पक्ष कार्यात सक्रिय सहभाग घेऊ न शकलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील यांना या निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री अंनत गीते यांच्या आदेशाने सर्व जुन्या व नवीन शिवसैनिकांना सोबत घेऊन पेण-सुधागड मतदार संघाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी विष्णू पाटील यांच्या खांद्यावर देऊन आम्ही निवडणुका लढविणार व सुधागड पंचायत समितीवर तसेच शिवतीर्थावर भगवा फडकविणार असल्याचे जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सांगितले. भविष्यात विष्णू पाटील यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देणार असल्याचे सूचित केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरु झाली असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी १२ जानेवारी रोजी शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
याप्रसंगी सुधागड जिल्हापरिषदेचे पाली गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत, परळी गटाचे रवींद्र देशमुख, तसेच नाडसूर पंचायत समिती गणाचे उमेदवार सुषमा कदम, जांभूळपाडा गणाचे नंदू सुतार, परळी गणाचे उज्ज्वला देसाई, यांची शिवसेनेची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. त्याचप्रमाणे पाली पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली जागा आमचे मित्रपक्ष यांना सोडण्यात आलेली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची पहिली प्रचार सभा प्रचारप्रमुख विष्णू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मानखोरे येथे १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याचे सांगितले. या वेळी ताडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किसन धायगुडे, आप्पा खताळ, महादू खताळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेकापमधून शिवसेनेत प्रवेश केला. या पत्रकार परिषदेच्या वेळी माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील, नरेश गावंड आदी उपस्थित होते.