मंजुरीनंतरही रखडले रस्त्याचे काम; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंचासह सहकाऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:48 AM2020-02-04T04:48:53+5:302020-02-04T04:49:30+5:30
काळुंद्रे शिवकर मार्गाची दुरवस्था
पनवेल : काळुंद्र्रे शिवकर रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. काळुंद्र्रे फाट्याजवळून हा रस्ता विविध गावांना जोडला जातो. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मंजुरी मिळूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जात नसल्याने शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. ढवळे यांच्यासोबत यावेळी सखाराम पाटील,नरेश भगत यांनी देखील एमएमआरडीए प्रशासनाच्या विरोधात हे उपोषण पुकारले आहे.
शिवकर ग्रामपंचातीचे सरपंच अनील ढवळे यांनी यासंदर्भात १३ जानेवारी रोजी एमएमआरडीएला पत्र लिहून मंजूर रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे शिवकर ग्रामपंचात ही तालुक्यातील आदर्श ग्रामपंचात आहे. नुकतेच ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. शिवकर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे ग्रामपंचायतीने केली आहेत. मात्र एमएमआरडीएच्या अंतर्गत असलेल्या काळुंद्र्रे्रे शिवकर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे येथील रहिवासी, ग्रामपंचायतीला दोष देत असल्याने सरपंच अनिल ढवळे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
सोमवारी शिवकर येथील विठ्ठल मंदिर या ठिकाणी ढवळे यांनी साथीदारांसह उपोषण सुरू केले आहे. मात्र उपोषणाची त्वरित दखल घेत, रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरु करू, असे आश्वासन एमएमआरडीएचे अभियंता लोकेश चौसष्ठे यांनी दिले आहे. शिवकर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिल ढवळे यांनी पुकारलेल्या उपोषणाला मोठ्या संख्येने येथील रहिवासी व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.