नवी मुंबई : महानगरपालिकेच्यावतीने डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात आयसीयू व व्हेंटीलेटर्स बेडची व्यवस्था केली आहे. येथील आयसीयू बेडच्या व्यवस्थापनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यवस्थापनास दिल्या असून अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे.आयुक्तांनी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरीष पाटील व तेथील कार्यरत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, आरोग्य अधिकारी धन्वंतरी घाडगे व एनएमएमटीचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी नीलेश नलावडे उपस्थित होते. रुग्णालयाने आयसीयू बेड्सच्या व्यवस्थापनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. काही रुग्णांना आयसीयूची गरज नसतानाही त्यांना बेड दिला जातो. यामुळे खरोखर गरज असणाऱ्यांना बेड उपलब्ध होत नाही. अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांना गरज आहे त्यांना आयसीयू बेड मिळाला पाहिजे. रुग्णांवरील उपचारासाठीची प्रमाण कार्यपद्धतीचे पालन झाले पाहिजे. रुग्णालयीन व्यवस्थापनाप्रमाणेच रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर त्यांच्या लक्षणाप्रमाणे बेड उपलब्ध होतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.नवी मुंबईमधील रुग्णालयांमध्ये मनपा क्षेत्राबाहेर रुग्णही मोठ्या प्रमाणात येत आहेत. जवळपास ४० टक्के रुग्ण बाहेरील आहेत. नवी मुंबईमध्ये चांगले उपचार मिळत असल्याने येथे उपचारासाठी येत आहेत. रुग्णालयांनी उपचार व डिस्चार्ज प्रोटोकॉलचे पालन करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.चांगले उपचार नवी मुंबईमधील रुग्णालयांमध्ये मनपा क्षेत्राबाहेर रुग्णही मोठ्या प्रमाणात येत आहेत. जवळपास ४० टक्के रुग्ण बाहेरील आहेत. नवी मुंबईमध्ये चांगले उपचार मिळत असल्याने येथे उपचारासाठी येत आहेत.
"आयसीयू व्हेंटीलेटर्स बेडच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 1:12 AM