नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २१.८ किमीच्या शिवडी ते न्हावा-शेवापर्यंतच्या सी लिंकचे काम एमएमआरडीएकडून रात्रंदिवस सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा चंग प्राधिकरणाने बांधला आहे. या पुलावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांडून दोन टप्प्यात टोल आकारण्यात येणार आहे. कारसाठी २४० रुपये तर मल्टी ॲक्सल वाहनांसाठी ७८० रुपये टोल असणार आहे.
टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात दिली आहे. पुलावरून २०२२ मध्ये ३९,३०० वाहने तर २०४२ पर्यंत ५५ हजार वाहने दरराेज धावतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
वाशी पुलावरील भार कमी
शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक सुरू झाल्यानंतर सध्याच्या वाशी खाडी पुलावरील मोठा भार कमी होणार आहे. सुरुवातीला तो १० टक्के तर २,०३२ ती १६ टक्क्यांहून अधिक भार कमी होईल, असा अंदाज आहे.
प्रत्येक किमीवर सीसीटीव्ही
सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक किमी अंतरावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याशिवाय तत्काळ कॉल बॉक्स लावण्यात येणार आहेत. रोख आणि आटोमॅटिक दोन्ही पद्धतीने टोल वसूल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार असून ते एका ऑप्टिकल फायबर केबलद्वारे नियंत्रण कक्षास जोडण्यात येणार आहे.
३९,३०० वाहने २०२२ मध्ये जी धावतील
२४,१०० कार२,७०० टॅक्सी२,७०० बस २,२०० छोटी अवजड ३,००० मोठी अवजड४,६०० मल्टी ॲक्सल
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"