लोक मत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करणे शक्य नाही. यामुळे तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. प्रत्येक व्यक्तीची स्क्रीनिंग व्हावी. शहरवासीयांच्या सुविधेसाठी व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात यावी, अशा सूचना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केल्या आहेत.
नवी मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सतेज पाटील यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील कोविड सद्य:स्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या विविध कामांची व आगामी नियोजनाची माहिती दिली.
कोरोना चाचण्यांसाठी काही दिवसांतच नवी मुंबई महानगरपालिका स्वत:ची आरटीसीपीआर लॅब सुरू करीत असल्याबद्दल तसेच शहरातील बेड्सची संख्या रिअल टाइम नागरिकांना समजण्यासाठी आॅनलाइन लाइव्ह डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात येत असल्याबद्दल पाटील यांनी समाधान व्यक्त केले.