सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये टोल भरा; MMRDAकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर
By नारायण जाधव | Published: December 24, 2022 09:37 PM2022-12-24T21:37:46+5:302022-12-24T21:38:03+5:30
टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात दिली आहे.
नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २१.८ किमीच्या शिवडी ते न्हावा-शेवापर्यंतच्या सी लिंकचे काम एमएमआरडीएकडून रात्रंदिवस सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा चंग प्राधिकरणाने बांधला आहे. या पुलावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांडून दोन टप्प्यात टोल आकारण्यात येणार आहे. तो कारसाठी २४० रुपये तर मल्टि ॲक्सल वाहनांसाठी असणार आहे.
टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात दिली आहे. पुलावरून २०२२ मध्ये ३९,३०० वाहने तर २०४२ पर्यंत ५५ हजार वाहने दरराेज धावतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. २०२२ मध्ये जी ३९३०० वाहने धावतील, असा अंदाज होता त्यात २४१०० कार,२७०० टॅक्सी, २७०० बस, २२०० छोटी अवजड वाहने, ३००० मोठी अवजड वाहने ४६०० मल्टि ॲक्सल वाहनांचा समावेश आहे.
असे राहणार टोलचे दर
वाहनाचा प्रकार - शिवडी ते शिवाजीनगर - शिवाजीनगर ते चिर्ले जंक्शन -एकूण
कार १८०-६०-२४०
बस-४२०-१३०-५५०
छोटी अवजड वाहने २४०-७०-३१०
मोठी अवजड वाहने- ४२०-१३०-५५०
मल्टि ॲक्सल वाहने-६००-१८०-७८०
प्रत्येक एका किमीवर सीसीटीव्ही कॅमेरे
सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक किमी अंतरावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शिवाय तत्काळ कॉल बॉक्स लावण्यात येणार आहेत. रोख आणि आटोमॅटिक दोन्ही पद्धतीने टोल वसूल करण्यात येणार आहेत. याशिवाय वाहनचालकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार असून ते एका ऑप्टिकल फायबर केबलद्वारे नियंत्रण कक्षास जोडण्यात येणार आहे.
वाशी खाडीपुलावरील भार होणार कमी
शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक सुरू झाल्यानंतर सध्याच्या वाशी खाडीपुलावरील मोठा भार कमी होणार आहे. सुरुवातीला तो १० टक्के तर २०३२ ती १६ टक्क्यांहून अधिक भार कमी होईल, असा अंदाज आहे.